मराठवाडय़ाचा काही भाग वगळता राज्यभर पावसाने अक्षरश: तांडव मांडले असून गुरुवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे विदर्भ, कोकणासह अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा जिल्हात एका ठिकाणी वीज कोसळून पाच शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला. मुंबईतही शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतूक बंद पडून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. पावसाचे असेच वातावरण आणखी किमान दोन दिवस कायम राहणार असून, विशेषत: कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात दक्षिण गुजरात ते केरळ किनाऱ्यालगत गेल्या आठवडय़ापासून हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. ते आता ओडिशा किनारपट्टीपासून झारखंड-छत्तीसगडलगत पोहोचले आहे. या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून राज्यात दमदार पाऊस सुरू आहे, असे पुणे वेधशाळेतील अधिकारी एस. बी. गावकर यांनी सांगितले. रविवार सकाळपर्यंत राज्याच्या सर्वच भागात पाऊस कायम राहील. विशेषत: कोकण-गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भ व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेतर्फे जाहीर करण्यात आला आहे.
रायगड जिल्हय़ात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा शहराला पुराचा तडाखा बसला आहे. रोहा परिसरात गेल्या गुरुवारी तब्बल १७० मिमी पावसाची नोंद झाली.
वर्धा, यवतमाळला तडाखा
शुक्रवारी सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीने वध्र्यातील शंभरावर गावांना धोका निर्माण आहे. वध्र्यालगत धामणगाव वाठोडा या गावातील शेतात काम करणाऱ्या सात महिला घरी परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात सुजाता रतन ढोले (४५), वेणूताई दगडू राऊत (६५), अनिता मनोज चहांदे (३१), ललिता गुलाब भातसे, उमा अंबादास राऊत या पाच महिलांचा मृत्यू झाला तर उमा राऊत उपचारादरम्यान मरण पावल्या. दोघींवर उपचार सुरू आहेत.
रायगडमध्ये २४ तासांत सव्वाशे मिमी
रायगड जिल्ह्य़ाला पावसाने चांगलेच धुऊन काढले. गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी १२४.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काळ, सावित्री, कुंडलिका, आंबा, गांधारी, पाताळगंगा गाढी आणि उल्हास नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगडमध्ये २४ तासांत १२५ मिमी
रायगड जिल्ह्य़ाला पावसाने चांगलेच धुऊन काढले. गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी १२४.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काळ, सावित्री, कुंडलिका, आंबा, गांधारी, पाताळगंगा गाढी आणि उल्हास नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील धरणे ३६ टक्के भरली
विभागानुसार टक्केवारी
कोकण ७२
पुणे ३७
मराठवाडा ९
नागपूर ५३
अमरावती ४४
नाशिक १७
राज्यातील प्रमुख धरणांची टक्केवारी
मुंबई-कोकण
मोडकसागर ८५
तानसा ९२
विहार ६१
तुळशी १००
वैतरणा ५३
भातसा ६५
बारवी ७२
पुणे विभाग
पानशेत ५७
वरसगाव ३९
पवना ५६
उजनी ०
कोयना ६६
धोम ४०
उरमोडी ६२
वारणा ६२
दूधगंगा ५५
राधानगरी ६८
नाशिक विभाग
दारणा ६०
गंगापूर ३६
मुकणे १०
भंडारदरा ४१
मुळा २०
गिरणा ०
हातनूर ३
मराठवाडा विभाग
जायकवाडी ०
उध्र्व पेनगंगा ३९
विष्णुपुरी ४९
येलदरी ०
माजलगाव ०
विदर्भ
पेंच-तोतलाडोह ६२
इटियाडोह ३१
उध्र्व वर्धा ४२
गोसी (खुर्द) ६३