महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा झाली. मनसे आता महायुतीत सहभागी होणार, अशा चर्चांना जोर आला होता. परंतु, या भेटीत नेमकं काय ठरलं? हे गुलदस्त्यात होतं. या भेटीबाबत भाजपा किंवा मनसेने कोणतीही माहिती जाहीर केली नव्हती. दरम्यान, राज ठाकरे यांनी या भेटीबाबत मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या जाहीर भाषणात सविस्तर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरेंनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत किती आणि कोणत्या जागा लढवणार, मनसेने कोणत्या जागांसाठी आग्रह धरला आहे? यावर वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्या चर्चांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, होय! जागावाटपावर चर्चा झाली. मात्र मला अशा चर्चा जमत नाहीत. मी खरं सांगतो, मी जागावाटपाच्या चर्चेला १९९५ साली शेवटचा बसलेलो. त्यानंतर आजतागायत मी अशा चर्चेला बसलो नाही. कारण अशी चर्चा करणं मला शक्यच नाही. तू दोन जागा घे, चार जागा मला दे, ही जागा मला नको, ती जागा तू घे, मला इथे सरकव, तू तिथे जा… असली चर्चा मला कधीच जमणार नाही. माझ्याच्याने हे होणार नाही. त्यानंतर मला सांगण्यात आलं की, आमच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढा, मी त्यांना (भाजपा) स्पष्ट सांगितलं ते होणार नाही.

मनसे अध्यक्ष म्हणाले, मनसेचं रेल्वेइंजिन हे पक्षचिन्ह मी महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टाने कमावलं आहे. हे चिन्ह माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलंय चिन्ह म्हणून मी त्यावर लढायचं असं अजिबात नाही. पक्षचिन्हावर कसलीही तडजोड होणार नाही. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी ‘दिल्लीत जाणारा पहिला ठाकरे’ अशी बातमी दाखवली. खरंतर या पत्रकारांना काही माहिती नसतं. अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात. कोणी कोणाला भेटल्याने लहान-मोठा होत नसतो. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील दिल्लीत जाऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते संजय गांधी यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला येऊन भेटले होते. अशा भेटींमुळे कोणी लहान-मोठं होत नाही. भेटायला जाण्यात कसला कमीपणा?

हे ही वाचा >> “शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण

मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. आज त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. राज ठाकरेंनी लोकसभा लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीचेही आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray on what bjp offers mns for lok sabha election 2024 amit shah asc
First published on: 09-04-2024 at 21:42 IST