Raj Thackeray on Meat Sale Ban: १५ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मटण-मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयावर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे.

कल्याण-डोंबिवलीसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी अशा काही महापालिकांनीही अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये १५ ऑगस्ट रोजी मटणाची मेजवाणी ठेवण्याचा इशारा काही राजकीय नेत्यांनी दिल्यानंतर पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. शहरात मटण, मांस खाण्यावर नाही तर विक्रीवर बंदी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांना यासंबंधीचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, “आमच्या लोकांना हे सर्व चालू ठेवण्यास सांगितले आहे. महानगरपालिकेला या गोष्टीचे अधिकार नाहीत. कुणी काय खावे आणि कुणी काय खाऊ नये? हे ठरविण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीत.” एका बाजूला स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना खायचे स्वातंत्र्य नाही?, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी बंदी हाच मोठा विरोधाभास

राज ठाकरे पुढे म्हणाले, “स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कशावर तरी बंदी आणणे हाच मोठा विरोधाभास आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या दोन दिवशी तुम्ही बंदी कशी काय आणू शकता? कुणाचा काय धर्म, कुणाचे काय सण आहेत? यानुसार कुणी काय खावे, हे सरकारने सांगण्याची गरज नाही.”

कबुतरखान्यांवरील बंदी योग्यच

 “कबुतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. जैन मुनींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली आहे, तर त्याप्रकारे ती गोष्ट झाली पाहिजे”, असे सांगून राज ठाकरे यांनी कबुतरखान्यावर उच्च न्यायालयाने घातलेली बंदी योग्यच असल्याचे म्हटले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “कबुतरांमुळे कोणत्या प्रकारचे रोग होतात, याबद्दल अनेक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. कबुतरांना खायला देऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगूनही जर कुणी खायला टाकत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर खायला टाकत असाल तर ते चुकीचे आहे.”