भिंगारमध्ये मंगळवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या दगडफेकीवरून दोन्ही पक्षांच्या प्रमुख १४ जणांसह अन्य सुमारे २०० जणांवर दंगलीचा तसेच सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दगडफेकीत जखमी झालेले सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप उगले यांची प्रकृती आता सुधारत आहे.
दगडफेक झाली असली तरीही दोन्ही गटांनी पोलिसांकडे फिर्यादी दाखल न करता एकमेकांवर तोंडीच राळ उडवली. पोलिसांनी स्वत:च फिर्यादी होत दोन्ही गटांच्या २०० जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला. त्यात मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले, जिल्हाध्यक्ष कैलास गिरवले, जिल्हा संघटक सचिन डफळ, महिला आघाडी प्रमुख अनिता दिघे, गणेश व अमोल वाघस्कर, नितिन भुतारे व अन्य १०० ते १५० जणांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे, नगरसेवक अरीफ शेख, समद खान तसेच मतीन सय्यद, अफजल शेख, मुश्ताक कुरेशी व अन्य ७० जणांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार बापूसाहेब रावसाहेब फोलाने यांनी फिर्याद दिली आहे. दगडफेक, शिवीगाळ, आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे कृत्य करणे यावरून दोन्ही गटांच्या सर्वाविरोधात कलम १४३, ४७, ४९ नुसार दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सरकारी कामकाजात अडथळा आणून पोलीस अधिकाऱ्यास जखमी केले म्हणून ३५३, ३३२ ही कलमेही आरोपींना लावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख करीत आहेत. मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यावर आज दिवसभर दोन्ही गटांचे आरोपी शहरात मोकळेच फिरत होते. नियमाप्रमाणे त्यांना अटक करून न्यायालयात सादर करणे गरजेचे होते. मात्र गुन्हा दाखल झालेले मनसेचे सर्वजण मनसेच्या कार्यक्रमात हजर होते, तर राष्ट्रवादीचे पदाधिकाराही सकाळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray stone pelting case registered against 200 mns and ncp activist
First published on: 27-02-2013 at 07:35 IST