लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दोन्ही उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी, काँग्रेस) व राजीव राजळे (नगर, राष्ट्रवादी) उद्या (गुरुवार) त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्री या वेळी उपस्थित राहणार असून उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठय़ा शक्तिप्रदर्शनाचा घाट दोन्ही पक्षांनी घातला आहे.
माळीवाडय़ातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल होणार आहेत. येथेच दोन्ही उमेदवार त्या त्या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर दिल्ली दरवाजा येथे दोन्ही काँग्रेसची जाहीर सभा होणार असून सुळे यांच्यासह जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे तसेच दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी व प्रमुख नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही काँग्रेसने ही निवडणूक कमालीच्या गांभीर्याने घेतली असून जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने गटबाजी संपवून मनोमिलनाच्या आणाभाका नुकत्याच घेण्यात आल्या. नगर येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस अपवाद वगळता दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्य़ातील प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत ठरल्यानुसार संयुक्त मेळाव्यांवरच दोन्ही पक्षांनी भर दिला असून, त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करताना उद्या मोठय़ा शक्तिप्रदर्शनाचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Mar 2014 रोजी प्रकाशित
राजळे, वाकचौरेंचा आज उमेदवारी अर्ज
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दोन्ही उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी, काँग्रेस) व राजीव राजळे (नगर, राष्ट्रवादी) उद्या (गुरुवार) त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
First published on: 19-03-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajale vakacaures nominations today