Rajan Salvi Breaking News Today : कोकणातील राजापूर विधानसभेत माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता कोकणात एकनाथ शिंदेंची
ताकद वाढली आहे.

आधी दिला राजीमा, आज शिवसेनेत प्रवेश

राजन साळवींनी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. “मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे” असे राजन साळवींनी म्हटलं आहे. शिवसेनेत २०२२ ला सर्वात मोठी फूट पडली. त्यावेळी राजन साळवी हे उद्धव ठाकरेंबरोबरच होते. मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदे हे माझे राजकीय गुरु आहेत असं म्हणत हातातलं शिवबंधन तोडून टाकलं आहे. तसंच हाती धनुष्य-बाण घेतला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व केलं

रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. मात्र गेल्या काही काळांपासून विनायक राऊत यांच्याशी राजन साळवी यांचा सातत्याने वाद झाला होता. या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. यातूनच ते शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणार हे नक्की झालं होतं त्याप्रमाणेच अखेर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून हाती धनुष्यबाण घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत राजन साळवी?

राजन साळवी हे राजापूर विधानसभेचे तीन वेळा आमदार होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. १९९३ ते ९४ च्या सुमारास ते शिवसेनेत सक्रीय झाले. त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्षपद भूषवलं होतं. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान राखलेल्या मोजक्या आमदारांमध्ये राजन साळवी यांचा समावेश होता. मविआ सरकारची सत्ता गेल्यानंतर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लागला होता. तरीही राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेटाने उभे राहिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज होते. यावरुन ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस सुरु होती. त्या सगळ्या कोंडीमुळे अखेर राजन साळवी यांनी हातावरचं शिवबंधन सोडून हाती धनुष्य बाण घेतला आहे. एकनाथ शिंदे हे त्यांना मोठी जबाबदारी देतील यात शंका नाही.