scorecardresearch

वाढत्या ऊस लागवडीविषयी शरद पवारांचे अज्ञान दुर्दैवी- शेट्टी

शेतकऱ्यांच्या जिवावर उभारले गेलेले साखर कारखाने पुढे रोहित पवार पळवत आहेत, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

सोलापूर : शेतकरी ऊस लागवडीकडे का वळले, हे देशाचे कृषिमंत्रीपद सांभाळलेल्या शरद पवार यांना कळले नसेल तर त्यांच्या या अज्ञानापेक्षा दुर्दैव ते कोणते, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पवार यांच्यावर टीका केली.

सोलापुरात शेतकरी मेळाव्यासाठी शेट्टी आले होते. नंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचाही खरपूस समाचार घेतला. राज्यात गाळपाच्या प्रतीक्षेत यंदा मोठय़ा प्रमाणात अद्याप ऊस शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी जालना येथे नुकतेच वाढत्या उसामुळे पीक बदलाचे आवाहन केले. मात्र या प्रश्नाला त्यांनाच जबाबदार धरत शेट्टी यांनी पवार यांच्यावर टीका केली.

जर कधी केंद्रीय कृषिमंत्री राहिलेल्या व्यक्तीला जर हा प्रश्न कळला नसेल तर त्यापेक्षा दुर्दैवी ते काय, असा सवाल त्यांनी या वेळी केला. शेट्टी म्हणाले, की ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक नाही. त्यासाठी १८ महिने मेहनत करावी लागते. नंतर उसाची नोंद करण्यापासून ते रास्त भाव मिळण्यापर्यंत साखर कारखानदारांकडे मिनतवारी करावी लागते. उसाला केंद्र सरकारने हमी भाव दिल्यामुळेच शेतकरी ऊस लागवड करतो. उलट शेतकऱ्यांच्या जिवावर साखर कारखानदार मोठे होतात. साखर संघापर्यंत अनेक बांडगुळांना ऊस उत्पादक शेतकरी पोसतो, असे परखड मत त्यांनी मांडले. शेतकऱ्यांच्या जिवावर उभारले गेलेले साखर कारखाने पुढे रोहित पवार पळवत आहेत, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

शेतकरी प्रश्नाला राज्य आणि केंद्र अशी दोन्ही सरकारे जबाबदार असल्याची टीका करत शेट्टी म्हणाले, की एकीकडे देशात महागाईमुळे सर्वच उत्पादनांच्या किमती वाढल्या असताना वर्षांनुवर्षे घाम गाळून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या अशा मूलभूत प्रश्नांवर केंद्र व

राज्य सरकारचे दुर्लक्षच होत आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी राज्यात सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये शेतीमालास हमीभाव मिळण्याची मागणी करणारे ठराव करून राष्ट्रपतींना पाठविणार असल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली.

वीजपुरवठय़ासाठी लढा उभारणार

राज्यात शेतकऱ्यांचे सर्वाधिक बळी जातात. त्यास सरकारचे रात्री शेती पंपासाठी वीजपुरवठा करण्याचे धोरण कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी म्हणून लढा उभारण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी देशात ३०० शेतकरी संघटना एकत्र येऊन लढणार असून प्रसंगी न्यायालयातही धाव घेण्याची तयारी सल्याचे शेट्टी यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raju shetti slams ncp president sharad pawar for sugarcane crop statement zws

ताज्या बातम्या