आयटकप्रणीत विविध कार्यकारी सोसायटी कर्मचारी संघटनेच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपास पाठिंबा देण्यासाठी येथील गोल्फ क्लबपासून सकाळी ११ वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध कार्यकारी सोसायटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, सर्व कर्मचाऱ्यांना सेवानियम लागू करावे, सेवानिवृत्त कामगारांच्या वारसांना सेवेत प्राधान्य द्यावे, कर्मचाऱ्यांना शिक्षण व अनुभवानुसार गटसचिव व जिल्हा सहकारी बँकेत भरतीवेळी प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ. राजू देसले, पोपट राजोळे, रवींद्र शिरसाठ, आबा वाघ आदींनी केले आहे.