‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्षपद दिल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील,’ असं वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होऊ’, असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं होतं. याच पार्श्वभूमीवर आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात आठवले यांना एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला यावेळी त्यांनी शरद पवारांना आपण फार पूर्वी याबद्दल सल्ला दिली होती अशी आठवण सांगितली. ‘विलीनीकरण करावे की नाही त्यांनी ठरवावं. मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा मी पवारांना सल्ला दिला होती की वेगळी काँग्रेस चालवण्यापेक्षा आपण सोनिया गांधी यांच्याशी भेटून चर्चा करावी. सोनिया गांधी अध्यक्ष आहेत आपण कार्यकारी अध्यक्ष व्हावे. काही काळानंतर तुम्हाला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. तुमची इच्छा प्रधानमंत्री होण्याची आहे तर अशी परिस्थिती आल्यास कदाचित तुमचा नंबर लागू शकेल. फक्त राष्ट्रवादी पक्ष चालवून शरद पवार कधीतरी पंतप्रधान होतील अशा स्वप्नांमध्ये राहून चालणार नाही असं मी त्यांना पूर्वी सांगितलं होतं. त्यावेळेला त्यांनी अशी काही शक्यता नसल्याचे मत व्यक्त केलं होतं,’ असं आठवले म्हणाले.
नक्की वाचा >> आठवले म्हणतात, ‘आदित्यऐवजी शिवसेनेचा ‘हा’ नेता मुख्यमंत्रीपदासाठी अधिक योग्य’
शिंदेंनी मांडलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पवारांना काँग्रेसचे अध्यक्षपद दिल्यास मान्य करण्याची शक्यता असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. ‘आता सुशीलकुमार शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करुन एकच पक्ष तयार करावा. मात्र असे झाल्यास शरद पवार यांना कोण पद देणार असा प्रश्न निर्माण होईल. आताच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये राहुल गांधी अध्यक्ष व्हायला तयार नाहीत. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. त्यामुळे शरद पवार यांना अध्यक्षपद देत असतील तर राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मान्य करु शकतो. शरद पवार यांना अध्यक्षपद दिल्यानंतर ते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊ शकतील असं वाटतं,’ असे मत आठवले यांनी व्यक्त केले.
याच मुलाखतीमध्ये आठवले यांनी सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेपेक्षा भाजपाला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच आदित्य यांनी आखीन काही काळ मुख्यमंत्रीपदासाठी वाट पाहायला हवी असंही आठवले म्हणाले आहेत. ‘सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्त जागा या भाजपाच्या येतील आणि देवेंद्रजीच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं. मुख्यमंत्रीपदी उद्धवजींचा आणि आदित्य ठाकरेंचा नंबर लागेल असं वाटतं नाही. आदित्य यांना मुख्यमंत्री होण्यास वेळ आहे अजून १०-१५ वर्ष त्यांनी वाट पाहिली पाहिजे,’ असंही आठवले म्हणाले.