राष्ट्रवादी काँग्रेसेच नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना, राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली. तसेच, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हे सांगत त्यांनी राणे, राणा आणि राज हे RRR असंच जुळलेलं दिसतय. असंही ते म्हणाले.

माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी, “कायद्यासमोर कोणीही मोठं नाही. नारायण राणे हे केंद्रीयमंत्री आहेत, परंतु कुठेतरी एखा शब्दात ते अडकले आणि त्याबरोबर त्यांना मग अटक व्हावी लागली. राणे झाल्यानंतर मग राणा दाम्पत्य, ते खासदार आणि आमदार आहेत. परंतु न्यायालयानेच जे काही त्यांना फटकारलं, की तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करण्याचा अधिकार कोणी दिला? दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन या सगळ्या गोष्टी करायचा. तुम्ही स्वत: कायदे बनवणारे आहात, तर तुम्ही असं कसं काय करू शकतात. त्यामुळे आपण पाहतोय की आज दहा-पंधरा दिवस झाले, त्यांना जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. राणे काय, राणा काय आणि आता राज काय. हे बरोबर RRR असंच जुळलेलं दिसतय.” असं बोलून दाखवलं.

तसेच, “ज्यावेळी ते अशी काही विधानं करतात, त्यावेळा हा धोका पत्कारून ते बोलत असतात. त्यामुळे असं होऊ शकतं. अटक होईल की नाही मला काही माहिती नाही. परंतु पुढची जर काही कारवाई करायची असेल, अजामीनपात्र असेल तर कोर्टात जामीन मिळेलच. आता त्यातून लोकांमध्ये काय संदेश जाईल. पक्षासाठी उपकारक संदेश जाईली की अपकारक जाईल? हे थोडसं आपल्याला पाहावं लागेल, त्यानंतर ते लक्षात येईल.” असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

याचबरोबर, “ते आंदोलन करण्यावर ठाम असतील, तर आंदोलनानंतर पोलीस आपलं काम करतात मग पोलिसांना कुठलाही दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण आपण ते जाणूनबुजून करत असतो. जाणूनबुजून कायद्याचं उल्लंघन करत असतो. कायदा हातात घेत असतो आणि त्याचे पुढे परिणाम काय असतात हे आपल्याला माहीत असतात. आता त्या परिणामाला तयार व्हायचं की नाही, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे.” असं देखील छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.