कोपर्डी आणि तळेगाव अजिनेरी येथील घटनांमुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असताना रायगड जिल्ह्यातही अल्पवयीन आदिवासी मुलीची शारीरिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडी येथे राहणारी १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी एका सामाजिक कार्यक्रमासाठी सोमवारी संध्याकाळी डोंगरावरील आदिवासी वाडीवर गेली होती. पाचवी पूजनाचा कार्यक्रम उरकून ती रात्री घरी येण्यास निघाली. यावेळी दिलीप संजय नाईक या २२ वर्षीय तरुणाने तिला गाठून शारीरिक संबध ठेवण्याची मागणी केली. यास मुलीने नकार दिला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. संतापलेल्या दिलीपने मुलीवर शारीरिक अत्याचार केले आणि तिची दगडाने ठेचून निर्घूण हत्या केली व तो पसार झाला.
याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३०२, ३७६(अ) आणि बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा कलम ४, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिलीप नाईक याला अटक करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक आर. एन. राजे या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि तपास कामाचा आढावा घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape and murder of a tribal girl in raigad district
First published on: 13-10-2016 at 19:26 IST