रत्नागिरी – गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी अंगारकी चतुर्थी निमित्त भक्तांचा महासागर लोटला. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून श्रींचे दर्शनासाठी रांगा लावण्यास सुरुवात झाली. रत्नागिरीतील गणपतीपूळे या ठिकाणी अंगारकी चतुर्थी निमित्त स्थानिक तसेच परजिल्ह्यातील भाविकांनी गणेश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. जणू याठिकाणी गणेश भक्तांचा महासागरच लोटला.

गणपतीपुळे येथील गणेश मंदिरात साजरी होणारी अंगारकी चतुर्थीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी सोमवार पासूनच मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. याठिकाणी सोमवारी रात्री पासूनच दाखल झालेल्या भाविकांनी मध्यरात्रीपासूनच रांग लावण्यास सुरुवात केली. पहाटे साडेतीन वाजल्या पासून मंदिरात गणेश दर्शनाला सुरुवात करण्यात आली.

अंगारकीनिमित्त येणारे भाविक लक्षात घेऊन गणपतीपुळे देवस्थानकडून पहाटे लवकर पूजा करून साडेतीन वाजल्यापासूनच श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या दर्शनासाठी नारळबागेत ३७ दर्शन रांगा, पार्किंग परिसरात ९ रांगा आणि मंदिर व रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात ३ रांगा लावण्यात आल्या आहेत. हे मंदिर मंगळवारी रात्री उशिरा पर्यत भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.