रत्नागिरी : राज्याच्या उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यातच उद्योग आजारी पडत आहेत. त्याकडे उद्योगमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त करुन महायुतीतीलच भाजपा जिल्हाध्यक्षांनी घरचा आहेर उद्योगमंत्र्यांना दिला आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना फैलावर घेतल्याने देवरुख येथील विश्वकर्मा कृषी अवजारे समूह उद्योगाचे अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांनी उपोषण सोडले. तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणाला सूचना देण्यात येणार आहेत. मागण्या मान्य झाल्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर रविवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “मुलाशी काय भिडता? बापाशी…”

यावेळी उपोषण सोडताना मसुरकर भावुक झाले, भाजपाने लक्ष घातल्यामुळे हा प्रश्न सुटला आहे, असे सांगितले. मसुरकर हे गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. मागील महिन्यात त्यांनी देवरुखला उपोषण केले होते. हा समूह उद्योग सुरूच न होता बंद पडला होता. त्यांचा पाठपुरावा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केला. त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हणबर यांचा कार्यालयात जाऊन समाचार घेतला. राज्य सरकार पैसे देतंय, पण उद्योग चालू होत नाही, असे चालणार नाही. हा उद्योगमंत्र्यांचा जिल्हा आहे, तरीही उद्योग बंद पडत आहेत, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी त्यासाठी काहीही करत नाहीत, याबद्दल जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी झाल्यानंतर मशीन ऑपरेटरद्वारा मुख्य घन मशिन ट्रायल करून देण्याबाबत कार्यवाही करावी. मुख्य घन मशिन, हॅमर फोर्जिंग मशीनची ट्रायल झाल्यानंतर मसुरकर यांनी स्वतः कायमस्वरूपी वीज जोडणी घेण्याबाबत अर्जदारांना निर्देश दिले आहेत. उर्वरित मागण्या शासन स्तरावर कळवण्यात याव्यात, असे पत्र अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष वारंवार पाठपुरावा करत असल्याने प्रशासन हलले आहे, असे देवरुख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी सांगितले. हा उद्योग सुरु व्हावा आणि लोहार समाजाला मदत व्हावी, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – सोलापूर : नातेपुतेजवळ मोटार-टेम्पो अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू, तिघे जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी भाजपाचे मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, नीलेश आखाडे, तालुका सरचिटणीस उमेश देसाई, अमोल गायकर, शहराध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस मंदार मयेकर, मंदार खंडकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष रुपेश कदम आदी उपस्थित होते.