रत्नागिरी – रत्नागिरीत जिल्ह्यातील खेड लोटे एमआयडीसी शनिवारी पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरली. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विनती ऑरग्यानिक केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती केमिकल कंपनीमध्ये शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता लक्षात घेता, येथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेत समीर खेडेकर या कामगाराचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.
मृत समीर खेडेकर लोटे घाणेकुंठ येथील रहिवासी होता. तो या विनती केमिकल कंपनीमध्ये बॉयलर ऑपरेटर म्हणून काम करत होता. स्फोटात तो गंभीर जखमी झाल्याने तत्काळ उपचारासाठी चिपळूण येथील लाइफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट बॉयलरमधून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटात कंपनीच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटानंतर स्थानिक प्रशासन व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यातील इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येवून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.