रत्नागिरी – राज्य शासनाची लाडकी बहिण योजनेच्या अर्ज छाननीचा रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५० हजार ७९८ एवढ्या बहिणींना फटका बसला आहे. जिल्ह्यातून ४ लाख २४ हजार ४४० महिलांनी नोंदणी करण्यात आली होती. मात्र योजनेच्या अटीमध्ये बदल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद होत असल्याने लाडक्या बहिणींनी शासना विरोधात आता तीव्र स्वरुपात नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ ला रत्नागिरी जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना आकर्षित करण्यासाठी सुरू झालेल्या ही महत्त्वाकांक्षी योजना आता शासनाने गुंडाळण्यास सुरुवात केली आहे.

या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यामधून ४ लाख २४ हजार ४४० महिलांनी नोंदणी करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील ५० हजार ७९८ एवढ्या लाडक्या बहिणींचे अर्ज विविध कारणांनी रद्द बाद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज बाद झालेल्या अशा महिलांच्या खात्यात अद्याप ही जूनचा हप्ता जमा झालेले नाही. जिल्ह्यातील अशा महिलांचे अर्ज बाद होण्यामागे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी करणे, २० वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील महिलांची नोंदणी अशा मुख्य कारणांमुळे अर्ज बाद झाले आहेत.

राज्यात या योजनेचा लाभ सदन कुटुंबातील महिलांनीही घेतल्याची माहिती समोर आली आहे. नोकरीला असणाऱ्या, मोठी शेती असणाऱ्या व अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही आता या योजनेतून वगळण्यात येत असून त्यांचे अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाडक्या बहिण योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर यातील ४६ हजार ४६२ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तर वीस वर्षापेक्षा कमी आणि ६५ वर्षापेक्षा अधिक वय असणारे ४ हजार ३३६ अर्ज बाद करण्यात आले आहेत. तसेच इतर कारणांनीही काही अर्ज बाद करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी रत्नागिरी तालुक्यात करण्यात आली होती. या तालुक्यात ५४ हजार १३७ महिलांनी अर्ज केले होते. तसेच चिपळूण तालुक्यात ४३ हजार ८३१, संगमेश्वर तालुक्यात ३२ हजार ५६८ महिलांनी अर्ज नोंदणी केली होती. या नोंदणीसाठी डिजिटल माध्यमांचा जास्त वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील आता संपुर्ण जिल्ह्यात २ लाख ७४ हजार ४५३ महिलांनी मोबाईल फोनद्वारे, तर १ लाख ४९ हजार ९८७ महिलांनी पोर्टलद्वारे नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता या योजनेचा लाभ घेणा-या महिलांचे अर्ज बाद होवू लागल्याने महिलांची चिंता वाढू लागली आहे. याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

शासनाने योजनेच्या नावाने आमच्या कडून मते मिळविली. आम्हाला आमिष दाखवले. आता या योजनेतील अर्ज बाद केल्याने या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे. – सारिका तोडणकर, लाभार्थी महिला, रत्नागिरी.

शासनाचे नियम आता बदलले आहेत. मात्र या आधी सर्व नियम बरोबर होते. योजना काढतानाच शासनाने विचार पूर्वक काढायला पाहिजे होती. या अटी घालून शासनाने आमची फसवणूक केली आहे. – अस्मा काझी, लाभार्थी महिला, चिपळूण