सेनेतील दोन गटांच्या कथित फाटाफुटीच्या पाश्र्वभूमीवर अखेर शहरात आयोजित दोन्ही पर्यटन महोत्सव यथासांग पार पडले तरी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त येथे आलेल्या पालकमंत्र्यांनी या महोत्सवांकडे पाठ फिरवली. त्यामुळे सेनाअंतर्गत गटबाजीच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या २९ एप्रिल ते १ मे या काळात यंदा प्रथमच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला. याच कालावधीत मांडवी पर्यटन व विकास संस्थेतर्फे गेल्या २८ एप्रिलपासून मांडवीच्या समुद्रकिनाऱ्यावर स्वतंत्रपणे पर्यटन महोत्सव भरवण्यात आला. या महोत्सवात नगर परिषदेतील सत्ताधारी शिवसेनेचे काही सदस्य सहभागी झाल्यामुळे महोत्सव आयोजनाच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी गटामध्ये फूट पडल्याची चर्चा रंगली होती. सेनेचे आमदार उदय सामंत यांनी मांडवी महोत्सवाचे उद्घाटन करताना, पुढील वर्षांपासून दोन्ही महोत्सव एकत्रितपणे आयोजित केले जातील, असे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोन्ही महोत्सवांचे निमंत्रण असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी, महोत्सव काळात शहरात येऊनही त्यांच्याकडे पाठ फिरवल्यामुळे आता सेनेअंतर्गत गटबाजीची चर्चा नव्याने रंगली आहे. शिवसेनेचे आमदार सामंत यांना मानणाऱ्या गटाची सध्या नगर परिषदेत एकहाती सत्ता आहे. पण आमदार व पालकमंत्र्यांचे सूर सुरुवातीपासूनच कधी जुळलेले नाहीत, हे उघड गुपित आहे. त्यामुळे नगर परिषदेतर्फे आयोजित पर्यटन महोत्सवाला केवळ उपचार म्हणून पालकमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले होते आणि या भावनांची जाणीव असल्यामुळेच पालकमंत्री काल महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी शहरात येऊनही या महोत्सवाकडे फिरकले नाहीत, असे मानले जाते. त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या बैठका किंवा कार्यक्रमांना आमदार सामंत सहसा उपस्थित राहत नाहीत, याचीही महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुनरावृत्ती झाली.

या संदर्भात नोंद घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे, गेली दोन वष्रे मे महिन्यात स्वत: पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुक्रमे रत्नागिरी व चिपळूण येथे आंबा पर्यटन महोत्सव आयोजित केले होते, पण यंदा तशा उपक्रमाची जुळवाजुळव होण्यापूर्वीच आमदारांच्या गटाने नगर परिषदेतर्फे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करीत पालकमंत्र्यांच्या महोत्सवातील हवाच काढून घेतली.  अशा प्रकारच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे केवळ संध्याकाळी आयोजित झालेले सांस्कृतिक कार्यक्रम वगळता लाखो रुपये खर्चून आयोजित हे महोत्सव पर्यटनवाढीचा उद्देश साध्य करण्यात कितपत यशस्वी ठरले, हा संशोधनाचाच विषय ठरेल. एक मात्र निश्चित, एकाच कालावधीत झालेल्या या दोन महोत्सवांमुळे स्थानिक रत्नागिरीकरांना सांस्कृतिक आणि खाद्यपदार्थाचीही चांगली मेजवानी लाभली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.