ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे सरकारने शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत दिलेली नाही दिवाळी पूर्वी जर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही तर सर्व शेतकऱ्यांसह मातोश्रीवर जाऊ असा इशारा अमरावातीमधील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरेंना दिलाय. मुख्यमंत्री ठाकरे यांना शेतकऱ्यांना मदत करण्याची सद्बुद्धी देवो यासाठी आपण अंबादेवीकडे साकडे घातले असे राणा यांनी सांगितले.

“शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दिवाळी सुद्धा अंधारात घालवू”, असंही रवी राणा म्हणाले आहेत. “निसर्गाने यंदा शेतकऱ्याला साथ दिलेली नाही. शेती वाहून गेली, पिकं वाहून गेली, घरं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यावर कर्जाचं बोजं आहे. अमरावतीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय. अशा परिस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे. दिवाळीच्या आठ दिवसआधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता आली पाहिजे. अन्यथा मातोश्रीवरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही,” असं राणा म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी व राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कितीही पोलीस बंदोबस्त केला तरीही शेतकरी मातोश्रीवर पोहोचतील असा विश्वास देखील यावेळी रवी राणा यांनी व्यक्त केला. “कितीही अटक केली, ताब्यात घेतलं हुकूमशाही केली तरी शेतकरी मातोश्रीवर जाणार आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर दिवाळी होऊ देणार नाही,” असं राणा यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी पत्रकारांनी तुम्ही शेतकऱ्यांसोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता राणा यांनी मागील वेळेस घडलेला घटनाक्रम सांगितला, “मी जाणार की नाही हे सांगणार नाही. मागच्या वेळेस सांगितलं तेव्हा संपूर्ण फौजफाटा लावून गंगा सावित्री निवासामध्ये आम्हाला नजरकैदेत ठेवलं होतं. त्यामुळे मी स्वत: काय करणार हे बोलणार नाही. पण राज्यातील शेतकरी मातोश्रीवर जाऊन नक्की बोलणार,” असं राणा म्हणाले.