पालकमंत्री रविंद्र वायकर यांचा सवाल

गेल्या कित्येक वर्षांपासून युतीमध्ये एकत्रित असलेल्या शिवसेना आणि भाजपाच्या युतीमध्ये तेढ आली असून, दोन्ही मित्रपक्षांचे नेते एकमेकांवर शरसंधान करण्याची एकही संधी सोडत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने तालुक्यामध्ये आज झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करताना ‘मन की बात’ बोलणारे पंतप्रधान लोकांच्या मनातील बात कधी ऐकणार? असा सवाल उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पाठीत मागून खंजीर खुपसणारा मित्र नको असा टोलाही भाजपला लगावला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने आज शहरातील मातोश्री कार्यालयामध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी पालकमंत्री वायकर यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संपर्कनेते विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, मुंबईचे तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख अनिल कुडाळी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना वायकर यांनी भाजपप्रणित शासनासह पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली. अहमदाबादमध्ये जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा शुभारंभ करणाऱ्या भाजपप्रणित शासनाकडून कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला कधी प्राधान्य दिले जाणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मेक इंडियासाठी वारंवार परदेश दौरे करणाऱ्या पंतप्रधानांनी इंडियाला मात्र, दरीद्री बनविल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

कोकणच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन लक्ष देणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख कदम यांनी मनोगत व्यक्त करताना स्वपक्षातील बंडखोरांनी स्वत:हून रिंगणातून उमेदवारी मागे घ्यावी असे आवाहन केले. जातीपातीचे राजकारण बाजूला सारून पुन्हा एकदा तालुक्यामध्ये सेनेचा भगवा फडकविण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

यावेळी संपर्कप्रमुख कदम, जिल्हाप्रमुख महाडिक, आमदार साळवी, माजी आमदार कदम, मुंबईचे तालुका संपर्कप्रमुख नकाशे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.