चिपळूण साहित्य संमेलनासाठी आमदार निधी आणि जिल्हा नियोजन मंडळाचा निधी वळवण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी येथील पत्रकारांनी निवेदनाव्दारे शासनाला केली आहे.
येत्या शुक्रवारपासून (११ जानेवारी) ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूणमध्ये भरत आहे. संमेलनासाठी राज्य शासनातर्फे २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त कोकण विभागातील १५ सर्वपक्षीय आमदारांनी आमदार निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये संमेलनासाठी ‘विशेष बाब’ म्हणून देण्याची शिफारस केली आहे. त्या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून २५ लाख रुपये देण्याचा निर्णय एकमताने झाला आहे. अशा प्रकारे संमेलनाला सुमारे सव्वा कोटी अतिरिक्त निधी दिला जाणार आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेता हा निधी संमेलनावर खर्च करणे अयोग्य असल्याने त्याबाबत फेरविचाराची विनंती करण्यात आली आहे. हा निधी देण्याबाबत फेरविचार करण्याच्या मागणीचे पत्रकारांचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.