शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात तर्क -वितर्क लावले जात आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत यांच्या अटकेप्रकरणी शरद पवारांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही, याचा अर्थ संजय राऊतांचा कार्यक्रम संपला आहे, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

संजय राऊतांच्या अटकेप्रकरणी शरद पवार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही, याबाबत विचारलं असता, संजय शिरसाट म्हणाले, “काल मी व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ पाहिला होता. ज्यामध्ये शरद पवारांनी ज्यांचा हात पकडला, ते सर्वजण तुरुंगात गेल्याचं चित्र दाखवलं होतं. शरद पवारांनी संजय राऊतांचा हातात हात घेतला ते तुरुंगात गेले, नवाब मलिकांचा हातात हात घेतला तेही तुरुंगात गेले आणि अनिल देशमुखही तुरुंगात आहेत. त्यामुळे लोकांना आता शरद पवार यांच्या हातात हात मिळवावा का? याची भीती वाटायला लागली आहे.”

हेही वाचा- सुजय विखे पाटलांनी केलेल्या बोचऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं केवळ आठ शब्दांत उत्तर, म्हणाल्या…

पुढे त्यांनी म्हटलं की, “शरद पवार हे जाणते नेते आहेत, ते मोठे नेते आहेत. त्यांनी कालपासून प्रतिक्रिया दिली नाही, याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा. शरद पवार एखादं वाक्य बोलले तर त्याचा अर्थ महाराष्ट्र नेहमी उलटा काढत आला आहे. तेच बोलले होते की, हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे, याचा अर्थ काय झाला? तर हे सरकार टिकणार नाही. हे शरद पवारांना आधीपासून माहीत होतं. ते आता प्रतिक्रिया का देत नाहीत? कारण त्यांना माहीत आहे, संजय राऊतांचा कार्यक्रम संपला आहे.”

हेही वाचा- “…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान

“शरद पवार यांच्याकडे संजय राऊतांसारखे अनेक प्यादी आहेत. राऊत हे त्यातील एक प्यादं होते. त्यांचा वापर करून झाला आहे. हे प्यादं बाद झाल्यानंतर त्याला बुद्धीबळाच्या पटावर त्यांना पुन्हा ठेवता येत नाही. त्यामुळे संजय राऊतांचा कार्यक्रम संपलेला आहे. शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली नाही, याचा अर्थ समजून घ्या, शरद पवारांच्या नजरेत राऊतांची किंमत शून्य झाली आहे. त्यामुळे आता संजय राऊतांचं नावही त्यांच्या तोंडून येईल, असं मला वाटत नाही” असंही शिरसाट म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebel mla sanjay shirsat on sharad pawar silence after sanjay raut arrested rmm
First published on: 02-08-2022 at 19:13 IST