महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा आज(रविवार), २४ ऑक्टोबर रोजी पार पडली. राज्यभरातील तब्बल १,०५० केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पार पडले असून दुसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळेत पार पडले. साडेतीन लाखांहून अधिक परीक्षार्थी विविध पदांसाठी या दोन स्वतंत्र सत्रांमध्ये परीक्षेस सामोरे गेले. राज्य शासनाच्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे संपूर्ण पालन करून ही परीक्षा घेण्यात आली.

करोनाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची ही भरती परीक्षा राज्यातील तरुणांसाठी शासकीय सेवेत दाखल होण्याच्या दृष्टीने उत्तम संधी ठरली आहे. सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेद्वारे गट क संवर्गातील शस्त्रक्रिया गृह साहाय्यक, कनिष्ठ/वरिष्ठ तांत्रिक साहाय्यक, दंत आरोग्यक, दूरध्वनीचालक, लघुटंकलेखक, वाहनचालक इत्यादी, तर दुपारच्या सत्रातील परीक्षेद्वारे अभिलेखापाल, आहारतज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन आदी पदांसाठी भरती होणार आहे. चार लाखांहून अधिक परीक्षार्थींनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी ३,५७,३३१ परीक्षार्थींनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले.

परीक्षा केंद्रांवर चोख व्यवस्थापन –

करोनाकाळात होत असलेली ही परीक्षा राज्य शासनाच्या करोनाविषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून पार पडली. परीक्षा केंद्रांच्या निर्जंतुकीकरणासह परीक्षार्थींसाठी निर्जंतुकीकरण आणि तापमान तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. राज्यभरातील आठ परिमंडळांमधील १७ जिल्ह्यांतील तब्बल १,०५० केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. पहिले सत्र २६० परीक्षा केंद्रांवर पार पडले, तर दुसरे सत्र ७९० परीक्षा केंद्रांवर झाले. दोन सत्रांमध्ये मिळून विविध पदांसाठी होत असलेल्या या परीक्षेसाठी तब्बल ३९ वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका होत्या. एकप्रकारे एकाच वेळी वेगवेगळ्या ३९ परीक्षा पार पडल्या असे म्हणता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन वा गैरप्रकार निदर्शनास आले असल्यास परीक्षार्थींनी 020 26122256 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा arogyabharti2021@gmail.com या ईमेल पत्त्यावर माहिती पाठवावी. परीक्षा प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली असून परीक्षार्थींनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत ‘न्यासा कम्युनिकेशन’ने या परीक्षेद्वारे निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार असल्याचे स्पष्ट केले.