scorecardresearch

Republic Day: रोज राष्ट्रगीत वाजणारं महाराष्ट्रातील एकमेव गाव; नऊ वाजून १० मिनिटांना सारं गाव होतं ‘सावधान’

मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. १५ ऑगस्ट २०२० पासून भिलवडीमध्ये सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास झाली सुरुवात

Village where National Anthem is played daily
गावामध्ये रोज सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी वाजते राष्ट्रगीत

प्रबळ इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि दृढ संकल्प असेल तर प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो, हेच सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी गावच्या गावकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. या गावामध्ये रोज सकाळी न चुकता राष्ट्रगीत वाजतं. अशाप्रकारे रोज राष्ट्रगीत वाजवणारं भिलवडी हे देशातील सहावे गाव आणि महाराष्ट्रातील पहिलेच गाव ठरले आहे. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या गावातील व्यापारी संघटनेने सुरु केलेली राष्ट्रगीताची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून अखंडीतपणे सुरु आहे.

रोज सकाळी दिनविशेष तसेच त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणं गावामध्ये वाजवलं जातं. तसेच रोज न चुकता बरोबर ९ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्गीत वाजवले जाते. व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टिमवरून हे राष्ट्रगीत लावलं जातं आणि त्याचा सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ मान राखतात. धार्मिक स्थळांमध्ये नियमितपणे भजन कीर्तन होणे ही काही नवीन गोष्ट नसली तरी गावात जन गण मन नियमितपणे ऐकायला मिळाले तर गावच देशासारखे भासू लागते, असं गावकरी सांगतात.

सांगली जिल्ह्यातल्या भिलवडीच्या व्यापाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी ही सर्व यंत्रणा बसवली. त्याप्रमाणे रोज सकाळचे नऊ वाजले की सायरन वाजतो. त्यानंतर पब्लिक अॅण्ड्रेस सिस्टीममधून राष्ट्रगीत वाजते. राष्ट्रगीत वाजू लागले की जो तिथे असेल तिथेच थांबून राष्ट्रगीताचा सन्मान करतो. नवख्या व्यक्तीसाठी हे सारं आश्चर्यचकित करण्यासारखेच आहे. मात्र, इथल्या ग्रामस्थांकसाठी हा एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग असल्याचं सांगतात. १५ ऑगस्ट २०२० पासून भिलवडीमध्ये सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा काहींना वाटले की देशभक्तीचा उत्साह काही दिवसांत किंवा आठवड्यातून कमी होईल. मात्र, सर्व निष्कर्ष खोटे ठरले. दहा हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या गाववजा शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह जागृत करण्याचं हे काम मागील अडीच वर्षांपासून सुरु आहे. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला या उद्घषोणेची सुरुवात करुन दोन वर्ष पूर्ण झाले.

नक्की वाचा >> परंपरा देशभक्तीची.. महाराष्ट्रातील हे सैनिकांचं गाव पाहिलं का?; इथल्या प्रत्येक घरातील एकजण आहे लष्करात

सतत प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रगीत वाजवण्याची कल्पना या गावातील काही व्यापाऱ्यांनी सुरु केली. सकाळी ९ वाजता सायरन वाजल्यानंतर, ५२ सेकंदांसाठी राष्ट्रगीत वाजवले जाते, जे गावात सर्वत्र ऐकवले केले जाते. ऑडिओ सुरू होताच, अगदी छोट्या गल्ल्या आणि रस्त्यांवरील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आपोपाप त्यांना सलाम करायला भाग पाडतात. गावातून जाणारा मार्गही अशाच प्रकारचा साक्षीदार आहे. सकाळी राष्ट्रगीत वाजते तेव्हा वाहतूक थांबते, तेव्हा विविध वाहनांतील नागरिक राष्ट्रगीतासाठी खाली उतरतात.

गावामध्ये राष्ट्रगीत वाजवण्यास सुरुवात झाल्यापासून गावात एकोप्याची भावना अधिक दृढ झालीय, असं गावच्या सरपंच सविता पाटील यांनी सांगितलं. तर, “हे यशस्वी करण्याचे श्रेय इथल्या लोकांना जाते, ज्यांनी केवळ पुढाकार घेतला नाही, तर दोन वर्षे देशभक्तीची भावना देखील त्यांनी यशस्वी करून दाखवली.असे बरेच लोक असतील जे वर्षातून फक्त दोनदा राष्ट्रगीताला उभे राहतील. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला. असे अनेक लोक असतील जे वर्षातून एकदाही राष्ट्रगीताला उभे राहणार नाहीत. चित्रपटगृहात चित्रपट पाहताना राष्ट्रगीताला मान देऊन उभे राहणारे काही लोकही असतील. त्यामागे फक्त कायद्याचा धाक असेल. मात्र महाराष्ट्रातील या छोट्याशा गावाने खूप सकारात्मक संदेश दिला आहे,” असं व्यापारी संघटनेचे सभासद असणाऱ्या दीपक पाटील यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Republic day 2022 a village where national anthem is played daily scsg

ताज्या बातम्या