भिल्ल समाजातील आदिवासी महिलेच्या मृतदेहाचा दफनविधी रोखण्यात आला. या गोष्टीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. इतकेच नाही तर महिलेच्या नातेवाईकांनी या महिलेचे प्रेत तहसील कार्यालयासमोर ठेवून आंदोलन केले. मात्र पोलीस आणि महसूल प्रशासनाने मध्यस्थी केली आणि हा तणाव शमला. पैठण शहराजवळच्या पाटेगाव या ठिकाणी ही घटना घडली.

रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पाटेगाव मध्ये राहणाऱ्या मीराबाई सुखदेव बरडे यांचे निधन झाले. त्यानंतर सोमवारी सकाळी मृत मीराबाईंचे नातेवाईक त्यांचा दफनविधी करण्यासाठी स्मशानविधीच्या जागेवर गेले. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांनी या सगळ्यांना विरोध केला. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध झाल्याने आधीच दुःखात असलेले नातेवाईक संतप्त झाले. तसेच त्यांनी गावकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या तहसील कार्यालयासमोर प्रेत ठेवले आणि ठिय्या आंदोलन केल. ज्या लोकांनी अंत्यसंस्कार रोखले त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी मृत मीराबाईंचे नातेवाईक सुमारे दोन तास करत होते. या घटनेमुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

अखेर गोदावरी नदीच्या काठावर मीराबाईंच्या मृतदेहावर पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक चंदन इमले, भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक बरडे यांच्यासह नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.