छत्रपती संभाजीनगर : शिवकाळाचा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील दगडी पायऱ्या तुम्ही काढून टाकणार का, आम्ही पुरोगामी आहोत निरीश्वरवादी नाहीत. त्यामुळे मंदिरातील सुधारणांना आमचा विरोध नाही. मात्र देवीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही, मंदिराचा एक दगडही हलू देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. आव्हाड तुळजापूर आणि तुळजाभवानी मंदिराची बदनामी करीत असल्याचा सांगत स्थानिक तुळजापूरकरांनी आव्हाडांची गाडी अडवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.

तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे. त्यातून तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीसह इतर विकासकामेही सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या सशुल्क आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. भाविकांना केवळ धर्मदर्शन आणि मुखदर्श उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मंदिरात सुरू असलेल्या गाभाऱ्यातील कामाला विरोध दर्शवला. मंदिर परिसरातील इतर विकास कामांना आपला विरोध नाही. मात्र, गरज नसताना देवीच्या गाभाऱ्याची मोडतोड का केली जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण सनातनी हिंदू नसलो तरी हिंदू आहोत. मंदिराच्या दगडालाही हात लावू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

जितेंद्र आव्हाड मंदिरात असतानाच, बाहेर जमलेल्या स्थानिकांमधून आव्हाड यांच्या वक्तव्याचा विरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. आव्हाडांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन करत भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या गोंधळात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मध्यस्थी केली. जमावाला बाजुला करत आव्हाडांच्या गाडीला पोलिसांनी वाट मोकळी करून दिली. आव्हाड निघून गेल्यानंतर, भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर देवीची आरती केली आणि जितेंद्र आव्हाड यांना ‘सद्बुद्धी’ मिळावी यासाठी देवीचरणी प्रार्थना करत घोषणाबाजी केली.