मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्था आमच्याच काही मित्रांच्या डोळय़ांत खुपत होती. त्यामुळेच एकीकडे या संस्थेचे अस्तित्व संपवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, तर दुसरीकडे वीज नियामक आयोगानेही पूर्वग्रहदूषित हेतूने संस्थेच्या विरोधात भूमिका घेऊन या मित्रांचे ईप्सित साध्य केले. मात्र संस्थेच्या अस्तित्वाची लढाई न्यायालयीन स्तरावर यशस्वी होत असल्याने संस्थेचे सभासद आणि कामगारांच्या भवितव्याचा विचार करून संस्थेचे पुनर्जीवन करण्यासाठी संघटितरीत्या कटिबद्ध राहू, असा निर्धार विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेची ४२वी वार्षिक सर्वसाधरण सभा मंगळवारी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विखे बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष सचिन गुजर, आ. भाऊसाहेब कांबळे, संस्थेचे संचालक भानुदास मुरकुटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आदी या सभेला उपस्थित होते.
विखे म्हणाले, मुळा प्रवरा संस्थेचा कारभार बंद झाल्यानंतर कार्यक्षेत्रात वीज वितरण कंपनीचा अनुभव कसा आहे हे आपण पाहात आहोत. मुळा-प्रवराच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली. त्याचे फळ म्हणून संस्था बंद पाडण्यात आली. १ लाख सभासदांनी संस्थेच्या अस्तित्वासाठी जनसुनावणीत एकमुखी पाठिंबा संस्थेच्या बाजूने दिला. अशी घटना क्वचितच घडली असेल. न्यायासाठी आपण संघटित राहिलो आणि संस्थेचा परवाना रद्द होऊ दिला नाही हे आपल्या सर्वाचे यश आहे. २ हजार कोटी रुपयांच्या थकबाकीचे भांडवल करून संस्थेला बदनाम करण्याचा अनेकांनी प्रयत्नही केला. संस्था व कामगारांच्या हितासाठी सर्व पक्षांना बरोबर घेऊन आपण कुठेही येण्यास तयार आहोत. न्यायालयीन लढाई सुरूच आहे. मागील सरकारने संस्थेच्या भवितव्याचा विचार केला नाही, नव्याने आलेल्या सरकारला आमची विनंती आहे टेरीफचा फरक भरून निघेल असा निर्णय करून संस्थेचा परवाना पुनर्जीवित करण्याचा ठराव या सभेने करावा असे आवाहनही त्यांनी केले.
म्हस्के यांनी मागील तीन वर्षांतील संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेऊन सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईमुळे संस्थेला व कामगारांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष सचिन गुजर, कार्यकारी संचालक कर्पे यांचीही भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resurrection of mula pravara power organization
First published on: 01-10-2015 at 03:00 IST