परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्य़ाला सलग दुसऱ्या दिवशी झोडपले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत पावसाचे विघ्न आल्याने उमेदवारांचाही हिरमोड झाला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे भातशेती धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्य़ातील बहुतांश भागाला वादळी पावासान हजेरी लावली आहे. यात पेण, पाली, रोहा, नागोठणे, उरण, पनवेल, कर्जत या परिसराचा समावेश आहे. पावसामुळे जिल्ह्य़ाच्या अनेक भागात विज पुरवठा खंडित झाला आहे, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. तळा तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास कोसळलेल्या पावसाने नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली.
सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. परंतु पावसामुळे प्रचारातही अडथळे येत आहेत. काही ठिकाणी पूर्वनियोजित सभा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा विरस झाला आहे. पावसाचे विघ्न असेच कायम राहिले तर कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहचणे अशक्य होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची चिंता वाढली आहे. नवरात्रीच्या दिवसातच पावसाने हजेरी लावल्यामुळे तरुणाईच्या उत्साहावर विरजण पडले. रात्री होणारे दांडिया, गरबा यासारखे कार्यक्रम रद्द करावे लागत आहेत.      यंदा पाऊस चांगला झाला असल्याने भातपीक उत्तम आले आहे. मात्र परतीच्या पावसामुळे ते हातचे जाते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे भातशेती अडचणीत येण्याची शक्यता आहे.