|| हेमेंद्र पाटील
सरावलीतील बेकायदा बांधकामांकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष:- पालघर तालुक्यातील अनधिकृत बांधकाम करण्यासाठी अग्रेसर असलेल्या सरावली भागात आता खाडी पात्रांतही बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. खाडी पात्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकामामुळे पावसाळ्यात बोईसर पालघर मुख्य रस्त्यावरही पाणी साचले होते. असे असले तरी दोन वर्षांपासून याठिकाणी होत असलेल्या बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरावली ग्रामपंचायत हद्दीत सरकारी जागेवर तसेच आदिवासी जागेवर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकाम उभी राहत आहेत. सरावली खाडीजवळ काही प्रमाणात मालकी जागा असून याठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. काही अनधिकृत बांधकामे थेट खाडीतच उभी केली जात आहेत. खाडी पात्रात बोईसर-पालघर मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकाम करून गॅरेज, दुकाने आणि शेड अशा अनेक प्रकारची बांधकामे भूमाफियांनी उभी केली आहेत. यातच याठिकाणी खाडी पात्रात कांदळवनावर भराव टाकून बांधकाम केले असतानाही कांदळवन संरक्षण समितीचेही दुर्लक्ष पाहावयास मिळते. न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन क्षेत्रापासून ५० मीटर अंतर सुरक्षा क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने खाडीभागात बांधकामासाठी मनाई करण्यात आली आहे. यामुळे येथील बेकायदा बांधकामावर कारवाई करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
पूरस्थितीचे संकट
बोईसर पालघर मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार केल्यानंतर रस्ता पावसाळ्यात खचून जाऊ नये, यासाठी खाडी भागात भिंत बांधण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत भूमाफियांनी भिंतीच्या बाहेरच्या बाजूने खारफुटीत दगडी भिंत बांधली आहे. त्यात भराव टाकून संपूर्ण भागात बांधकामे केली आहेत. यामुळे खारफुटी क्षेत्र बाधित झाले आहे. यातील बऱ्याच तिवरांची कत्तल करण्यात आली आहे. पावसाळ्यात बोईसर परिसरातील पावसाचे पाणी सरावली खाडीत मोठय़ा प्रमाणात येते. त्यामुळे हे पाणी खाडी ओसंडून रस्त्यावर येत असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन वाहतूक ठप्प झाली होती.