अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील तहसीलदाराचे नाव गुन्ह्यातून वगळावे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व निरीक्षक यांच्याविरुद्ध तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी महसूल अधिकाऱ्यांनी बुधवारपासून हिंगोलीत लेखणीबंद आंदोलन सुरू केले.
राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने औरंगाबादचे विभागीय आयुक्त, तसेच राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना या बाबत निवेदन पाठविण्यात आले. तेल्हारा येथील तहसीलदार सचिन पाटील यांच्याविरुद्ध अवैद्य वाळूउपसा करताना मजुरांचा दरड कोसळून मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. संघटनेतर्फे याचा तीव्र निषेध करण्यात आला. अधिकाऱ्यांना कामकाज करताना अशा अनेक प्रसंगांना समोरे जावे लागते. या प्रकरणाशी थेट संबंध नसणाऱ्या बाबीत गुन्हा नोंदविल्यास वाईट प्रथा सुरू होईल. कामकाज करणेही अवघड होईल, याकडे लक्ष वेधतानाच दाखल गुन्ह्यातून तहसीलदारांचे नाव वगळावे व बेकायदा गुन्हा दाखल करणाऱ्या निरीक्षक व उपविभागीय अधिकारी यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या मागणीसाठी मंगळवारपासून अमरावती विभागातील सर्व महसूल अधिकाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यास पाठिंबा म्हणून बुधवारपासून राज्यभरातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेऊन लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. औरंगाबाद विभागात लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण आंबेकर यांनी दिला असल्याचे विभागीय सचिव विद्याचरण कडवकर यांनी म्हटले आहे.