विखे पाटील कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ

राहाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या निर्णयामुळे सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळत आहे.अनेक वर्षे दिल्लीला चकरा मारून जाणत्या राजांना  काही करता आले नाही. त्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार आता सकारात्मक निर्णय घेत असल्याचे माहिती आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिली.

तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्माश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७२ वा गळीत हंगाम प्रारंभ कार्यœ म आज गुरुवारी झाला.या वेळी आमदार विखे यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सहकार मंत्री अमित शहा यांच्या समवेत झालेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करून केंद्रसरकारचे आभार मानले.माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास कडू, प्रवरा बँकेचे  अध्यक्ष अशोक म्हसे,जि. प. सदस्या रोहिणी निघुते, कामगार नेते ज्ञानदेव आहेर यांच्यासह सर्व संचालक, शेतकरी  सभासद, अधिकारी कामगार उपस्थित होते.

विखे म्हणाले,की राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर आयकराची टांगती तलवार मागील ५० वर्षांहून अधिक काळ होती. जाणते राजे २५ वर्षे दिल्लीत होते.फक्त दिल्लीत या, असा निरोप यायचा पण निर्णय कोणतेच झाले नाहीत.आज सहकारी साखर कारखान्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागत असल्याकडे लक्ष वेधले.दोन दिवस दिल्लीत झालेल्या बैठकांतून राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे विखे म्हणाले.

राज्यातील सहकारी साखर कारखानदारी संकटाचा सामना करीत वाटचाल करीत असली तरी  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासावर या चळवळीने साध्य केलेल्या प्रयत्नांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळत असल्याचे सांगितले.यंदाच्या गळीत हंगामात १३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून,सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण करण्याचा विश्वाास व्यक्त करतानाच पद्माश्री आणि माजी खासदार स्व.बाळासाहेब विखे यांच्या संस्काराने शेतकरी सभासदांचे हित जोपासण्याचे काम आतापर्यत झाले आहे.परंतु सुरू असलेल्या चांगल्या कामाला गालबोट लावण्याचे प्रयत्न केले जातात.ज्यांनी सहकारी संस्था बंद पाडल्या ते आज दुसऱ्यांच्या जिवावर आम्हाला सहकार शिकवायला निघाले असल्याचा टोला त्यांनी लगावला.

माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी विखे पाटील कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेऊन सहकारी चळवळ टिकवण्यासाठी या भागाने सदैव प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.उपाध्यक्ष विश्वास कडू यांनी प्रास्ताविक केले.संचालक कैलास तांबे यांनी आभार मानले.प्रारंभी कोविड संकटात दगावलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.