सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपची संख्या वाढवण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी काल (१२ डिसेंबर) विधान परिषदेत केली. या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यावर आती टीका केली जात आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनीही अजित पवारांवर टीका केली. ते टीव्ही ९ मराठीबरोबर बोलत होते.
“युवांबाबत कोणी शंका घेतली नाही पाहिजे. ही गरिबांची पोरं आहेत. पीएचडीसाठी जी काही तीन – पाच वर्षे लागतात, त्यासाठी मोठ्या निधीची गरज असते. त्यामुळे ते मदतीकरता सरकारकडे येतात. तो श्रीमंताचा पोरगा असता तर तो सरकारकडे आला असता का? असा सवाल रोहित पवारांनी विचारला.
हेही वाचा >> “मोदींनी सांगितलंय पकोडे तळायला”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार
ते पुढे म्हणाले, या मुलांकडे संधी, क्षमता, गट्स आहेत. ते सरकारी पैशांवर काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यावर तुम्ही शंका घेत असाल तर ते योग्य नाही. ही मराठी पोरं आहेत. त्यामुळे दादा जे बोलले त्याचा आम्ही निषेध करतो. कोणाच्याही भवितव्यावर शंका घेऊ नये. जी सरकारकडून मदत मिळणे अपेक्षित आहे, ती मिळालीच पाहिजे, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
सतेज पाटील हे विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सारथी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपच्या मुद्द्यावर बोलत होते. पाटील म्हणाले, “पीएचडी करू इच्छिणारे विद्यार्थी आशेवर होते की त्यांना सारथीकडून फेलोशिप मिळणार आहे.” त्यावर अजित पवार म्हणाले, “फेलोशिप घेऊन ते काय करणार आहेत?” त्यावर सतेज पाटील म्हणाले, “हे विद्यार्थी पीएचडी घेतील.” पाटील यांचं उत्तर ऐकल्यावर अजित पवार म्हणाले, “पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत?” अजित पवारांच्या या प्रश्नाचा सतेज पाटलांना आधी धक्का बसला. सतेज पाटील यांच्या शेजारी बसलेल्या आमदार भाई जगतापांनी तर डोक्याला हात लावला. त्यानंतर ते म्हणाले, दादा असं काय म्हणताय तुम्ही, या योजनेमुळे राज्यात पीएचडीधारकांची संख्या वाढेल. बार्टी, सारथी किंवा महाज्योतीसारख्या संस्थांमुळे पीएचडीधारकांची संख्या वाढेल आणि याचा राज्याला फायदाच होईल. त्याने काही नुकसान होणार नाही.
हेही वाचा >> “पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार?”, अजित पवारांचं सभागृहात वक्तव्य
सतेज पाटील म्हणाले, केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार अशी अट तुम्ही (राज्य सरकारने) नंतर लावली. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याआधी तुम्ही हे सांगायला हवं होतं. सर्व विद्यार्थ्यांनी तयारी केली, तुम्ही कट ऑफ डेट जाहीर केली आणि आता राज्य सरकार केवळ २०० फेलोशिपची अट ठेवत आहे. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. तसेच आमची मागणी आहे की, तुम्ही ही अट पुढच्या वर्षीपासून लागू करा.