देशातला वाढता करोना प्रादुर्भाव आणि नव्या ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यासह केंद्र सरकारही सतर्क झालं आहे. महाराष्ट्रात १५ फेब्रुवारीपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले असून देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा आणि रॅलींवरही निर्बंध आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत परंतु, त्यांच्या जागी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे उपस्थित होते. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं सुरू केलं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांच्या याच टीकेला आपल्या ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात, “मंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय आहे. पण पंतप्रधानाच्या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री हजर असताना, मुख्यमंत्री का उपस्थित राहिले नाहीत अशी टीका करणाऱ्या या नेत्यांनी हे केंद्राचं नाही तर महाराष्ट्राचं सरकार आहे, हे लक्षात घ्यावं”.

पवार पुढे म्हणाले, “तौक्ते वादळाच्या वेळेस आदरणीय पंतप्रधानांनी शेजारच्या राज्याची पाहणी करून त्यांना तातडीने हजार कोटी रुपयांची मदत केली आणि त्याचवेळी महाराष्ट्राला मात्र सापत्न वागणूक दिली. त्यावेळी मूग गिळून गप्प बसणारे भाजप नेते आज मात्र चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, हे आश्चर्यकारक आहे.”

केवळ केंद्रीय नेतृत्वाला खूष करून त्यांची मर्जी सांभाळण्याची राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच घेतली जाते. पण या राज्याचे आपण देणे लागतो, या भूमिकेतून कधीतरी राज्याच्या हिताची भूमिका घेण्याचं शहाणपण ज्या दिवशी त्यांना येईल, तो राज्यासाठी सुदिन असेल, असंही पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar news pm narendra modi cm uddhav thackeray rajesh tope vsk
First published on: 16-01-2022 at 14:55 IST