Rohit Pawar On Maharashtra Co op Bank Case : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ईडीने पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
रोहित पवारांनी या संदर्भात एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टच्या माध्यमातून सविस्तर प्रतिक्रिया देत कोणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलं?
“कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे. याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईलच”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
“तसेच विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे, महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे”, असा सूचक इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या… pic.twitter.com/J7zdxNtWS2
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 12, 2025
नेमकं प्रकरण काय?
ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहार प्रकरणात रोहित पवार यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलं आहे. दरम्यान, बारमती ॲग्रोसह अन्य कंपन्यांनी कथित एमएससीबी गैरव्यवहार प्रकरणात संशयास्पद व्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच यामाध्यमातून तोट्यात असलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा ईडीचा आरोप आहे.