Rohit Pawar post after Manikrao Kokate removed from maharashtra agriculture minister : महाराष्ट्र विधानसभेत रमी खेळतानाचा माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतानाचा कथित व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून कोकाटे आणि राज्य सरकारवर जोरदार टीकेचे झोड उठवली होती. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात होती. अखेर या व्हिडीओचा फटका कोकाटेंना बसला असून त्यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. तर दत्तात्रय भरणे यांना राज्याच्या कृषिमंत्री पदाची धुरा सोपण्यात आली आहे. यानंतर रोहित पवारांनी पुन्हा एकदा पोस्ट केली आहे.
रोहित पवार काय म्हणालेत?
रोहित पवारांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती.”
राज्याचे नवे क्रीडा मंत्री आणि कृषीमंत्री हे त्या-त्या क्षेत्रास न्याय देतील अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. “सरकारने कोकाटे साहेबांच्या राजीनाम्याऐवजी कृषी खाते काढून क्रीडा खाते देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील तसेच नवे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील, ही अपेक्षा.”
कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 1, 2025
यावेळी रोहित पवार यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे. महाराष्ट्र कोणत्याही मंत्र्याचा असंवेदनशीपणा खपवून घेणार नाही असे ते म्हणांले आहेत. त्यांनी म्हटले की, “कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये. आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, ही अपेक्षा!”
‘रमी’राव यांचं मनःपूर्वक अभिनंदन
खातेबदल झाल्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने सोशल मीडियावर पोस्ट करत माणिकराव कोकाटे यांना खोचक टोला लगावला आहे. “महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी व तरुण वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळो, अथवा न मिळो. मात्र, महायुतीमधील मंत्र्यांच्या कला-गुणांना नक्कीच चालना मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ‘रमी’राव यांचं मनःपूर्वक अभिनंदन,” अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अधिकृत खात्यावरून करण्यात आली आहे.