Rohit Pawar post on Atharv Sudame Reel : पुण्यातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आणि रीलस्टार अथर्व सुदामे याने समाज माध्यमांवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच वादात सापडला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या या व्हिडीओमध्ये त्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न अथर्वने केला होता. मात्र या व्हिडीओवर ब्राह्मण महासंघासह आणि इतर काही लोकांनी आक्षेप घेतला. ज्यानंतर अथर्वने समाज माध्यमांवरून हा व्हिडीओ हटवला तसेच माफी देखील मागितली. दरम्यान या प्रकारावर राजकीय वर्तूळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्या व्हिडीओमध्ये काहही आक्षेपार्ह नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे. त्याने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रीलमध्ये काहीएक आक्षेपार्ह नाही, उलट हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश या रीलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म-संस्कृतीला ते साजेसंच आहे. परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीने ट्रोल केल्याने त्याला हे रील डिलीट करण्याची वेळ आली,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.
पुढे रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रीलमध्ये काय चुकीचे आहे हे दाखवावं असे आवाहन केले आहे. “या रीलमध्ये चुकीचं काय आ
हे? हे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावं अन्यथा ट्रोल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात,” असे रोहित पवार म्हणाले आहेत. “अथर्व सुदामे यानेही ट्रोलरला न घाबरता बेडरपणे पुढं यायला हवं, कारण मराठी माणूस हा घाबरणारा नाही तर लढणारा असतो..!” असे आवाहन त्यांनी अथर्व सुदामे याला केले आहे.
अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे. त्याने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रिलमध्ये काहीएक आक्षेपार्ह नाही, उलट हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश या रिलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म-संस्कृतीला ते साजेसंच आहे. परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीने ट्रोल केल्याने…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2025
अथर्व सुदामेच्या रीलमध्ये काय होतं?
अथर्वने शेअर केल्याल्या व्हिडीओवर ‘मूर्ती एक, भाव अनंत’ असे लिहिले असल्याचे दिसून येत आहे. तर व्हिडीओमध्ये एक हिंदू तरुण मुस्लीम मूर्तीकाराकडून गणेश मूर्ती खरेदी करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. शेवटू यातून एकतेचा संदेश दिला होता.
अथर्व सुदामे काय म्हणाला?
अथर्व सुदामे याने व्हिडीओ डिलीट केल्यानंतर माफी मागणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, “मी एक व्हिडीओ माझ्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केला होता. मात्र, तो मी दुपारी डिलीट केला आहे. तो व्हिडीओ पाहून काही लोक नाराज झाले. काहींना तो व्हिडीओ आवडला नाही. परंतु, कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. हिंदू सणांवर, मराठी संस्कृतीवर आणि आपल्या भाषेबद्दल आतापर्यंत कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरने जितके व्हिडीओ तयार केले नसतील तेवढे व्हिडीओ मी केले आहेत. परंतु, ते करत असताना माझ्या मनात अजिबात कुठलाही वाईट हेतू नव्हता. तरी कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो. तसेच आतापर्यंत माझ्यावर जसं प्रेम केलंत ते कायम ठेवा.”