Rohit Pawar : महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्वीटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये माणिकराव कोकाटे हे मोबाइलवर रमी खेळताना दिसत आहेत. भाजपाच्या राज्यात काही कामच राहिलं नाही म्हणून कृषी मंत्री पत्ते खेळत आहेत अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?
“जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार हे कायमच विविध प्रश्नांवरुन आवाज उठवत असतात. आता रोहित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. माणिकराव कोकाटे या व्हिडीओत मोबाइलवर पत्ते खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अधिवेशनातला आहे असंही दिसतं आहे. त्याबाबत रोहित पवार यांनी भाष्य केलेलं नाही. मात्र जंगली रमी पे आओ ना महाराज या प्रसिद्ध टॅगलाइनचा उपयोग करत कधीतरी शेतकऱ्यांच्या बांधावरही या असं म्हणत रोहित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये हे ट्वीट केलं आहे. आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही भाष्य करतील का? किंवा माणिकराव कोकाटे स्पष्टीकरण देतील का? हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे.