मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईमुळे सध्या ड्रग्जचा विषय राज्यात चांगलाच चर्चेत आहे. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत असून आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान सर्वोतपरी प्रयत्न करत असून अनेक मोठ्या वकिलांना नियुक्त केलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ड्रग्जचं व्यसन लागलेल्यांना अटक न करता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

“जे दारू पितात किंवा धुम्रपान करतात त्यांना तुरुंगात पाठवले जात नाही. परंतु अंमली पदार्थांचे प्रमाण कितीही असले तरी त्यांना तुरुंगात टाकले जाते. हे बदलण्याची गरज आहे. जे व्यसनी आहेत किंवा ड्रग्जचं सेवन करतात त्यांना चांगल्या आरोग्यासाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले पाहिजे, त्यामुळे ते सुधारतील असा आमच्या मंत्रालयाचा विश्वास आहे,” असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

“चित्रपट उद्योगात सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात आणि भारतीय चित्रपटसृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “चित्रपटसृष्टीत अमली पदार्थांचा सर्रास वापर होत असून त्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील अंमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवनाचा मुद्दा समोर आला. “आर्यन खानवरील कारवाईत अजिबात पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. सक्तवसुली संचलनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच,” असं रामदास आठवले म्हणाले.