राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणं आवर्जून वाचण्यास सांगितलं. तसेच डॉ. आंबेडकरांची ही दोन्ही भाषणं पारायण करण्यासारखी असल्याचं नमूद केलं. ते मंगळवारी (२४ ऑक्टोबर) दसऱ्याच्या निमित्ताने नागपूर संघ कार्यालयात आयोजित विजय दशमी सोहळा कार्यक्रमात बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले, “एकमेकांविषयी जो अविश्वास आहे त्यातून बाहेर पडलं पाहिजे. आपल्या देशात राजकारण स्पर्धेवर आधारित आहे. आपल्यामागे जास्त अनुयायी उभे रहावेत म्हणून समाजाची विभागणी केली जाते. दुर्दैवाने ही परंपराच झाली आहे. त्यामुळे राजकारणातून समाजातील अविश्वासाचं उत्तर सापडणार नाही. राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून हा प्रश्न सुटेल, असं म्हणणं कुचकामी आहे.”

“आम्ही कुणाला शरण जातोय, असं मानण्याचं काही कारण नाही”

“आपल्याकडे लोकशाही आहे आणि इथं सर्व लोक सारखेच आहेत. कुणी उच्च नीच नाही. या पद्धतीनुसारच आपल्याला वागावं लागेल. मात्र, समाजाच्या एकतेसाठी आपल्याला राजकारणापासून वेगळं होऊन सर्व समाजाचा विचार करत मार्गक्रमण करावं लागेल. असं करत आम्ही कुणाला शरण जातोय, युद्ध सुरू होतं आणि आता युद्धबंदी झाली, असं मानण्याचं काही कारण नाही,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

“प्रतिमा सुधारण्यासाठी केलेली ही कृती नाही”

“हे स्वार्थासाठी केलेलं आवाहन नाही किंवा कोणत्याही पक्षाचंही आवाहन नाही. आपली प्रतिमा सुधारण्यासाठी केलेली ही कृती नाही. हे आपलेपणाचं आवाहन आहे. ज्यांना ऐकायला जाईल त्यांचं भलं होईल आणि जे यानंतरही ऐकणार नाहीत त्यांचं काय होईल, मला माहिती नाही,” असंही भागवत यांनी नमूद केलं.

व्हिडीओ पाहा :

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ती दोन भाषण वारंवार वाचा”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत मोहन भागवत म्हणाले, “संविधानात एकतेला मार्गदर्शक तत्व म्हणून नमूद करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान संसदेत मांडताना दोन भाषणं केली. ती दोन भाषणं लक्षपूर्वक वाचले की, लक्षात येतं की त्यातही हाच बंधुत्वाचा संदेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ती दोन भाषण नक्की वाचा, वारंवार वाचा.”

हेही वाचा : अग्रलेख : अर्थचक्रप्रवर्तन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“डॉ. आंबेडकरांची ती भाषणं पारायण करावी अशी आहेत”

“ती भाषणं पारायण करावी अशी आहेत. जसे आपण आपआपल्या श्रद्धेनुसार आपले पवित्र ग्रंथ दरवर्षी वाचतो, संघाचे कार्यकर्ते डॉक्टरांचं चरित्र दरवर्षी वाचतात, तसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य वाचता आले नाही, तर किमान ती दोन भाषणं १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला वाचत जा,” असं मोहन भागवत यांनी नमूद केलं.