भाजपच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या लालकृष्ण अडवाणींच्या राजीनाम्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिशय सावध प्रतिक्रिया देताना ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. भाजपच्या गोव्यातील कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या त्या अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहेत. भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह हे अडवाणींचे मन वळविण्याचे प्रयत्न करीत असून त्यानंतरच संघ या घडामोडींवर योग्यवेळी भाष्य करील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. त्यामुळे अंतर्गत कलहाचे शिखर गाठलेल्या भाजपातील घडामोडींवर संघाने सध्यातरी ‘वेट अँट वॉच’ची सावध भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील महाल परिसरातील मुख्यालयात आणि रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात राहणाऱ्या संघ स्वयंसेवकांमध्ये अडवाणींच्या राजीनाम्याच्या वृत्ताने प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. रेशीमबागेत नुकत्याच संपलेल्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या व्यासपीठावरून पहिल्यांदाच नक्षलवाद्यांच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेणाऱ्या सरसंघचालकांचे भाषण देशभर चर्चेचा विषय झाला असताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत दिल्लीत असल्याचे संघाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले तर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही गोव्यातील बैठकीत सहभागी झाल्यानंतर मीडियापासून दूर राहणेच अधिक पसंत केले होते. गोव्यातील बैठक आटोपून गडकरी आजच नागपुरात परतले आहेत.
नितीन गडकरी यांना चार राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्याची योजना अडवाणींचीच होती. नरेंद्र मोदींच्या विरोधात गडकरींना उभे करण्याच्या अडवाणींच्या प्रयत्नांमुळे नागपूर शहरावर राजकीय वर्तुळाचा ‘फोकस’ केंद्रित झाला होता. परंतु, गडकरींनीच नागपूर लोकसभा मतदारसंघावर निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याचे कारण सांगून हा प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे भाजपतील अंतर्गत वादाची ठिणगी संघ मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरातूनच पडली होती आणि या ठिणगीचा गोव्यातील कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा भडका उडाला.
याची पूर्वकल्पना संघ वर्तुळालाही नव्हती. गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी डॉ. भागवत यांनी संघ शिक्षा वर्गातील भाषणातून एकप्रकारे राजकीय अजेंडाच सुचविला होता. परंतु, भाजप नेत्यांमधील अंतर्गत कलह एकाएकी चव्हाटय़ावर येईल, याची पुसटशीही कल्पना संघ परिवाराला नव्हती.
संघाचे स्वयंसेवक अस्वस्थ
अडवाणींनी संपूर्ण हयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्राखाली घालविलेली आहे. आद्य सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवारांपासून ते आताच्या मोहन भागवतांपर्यंत त्यांचा अत्यंत घनिष्ट संबंध राहिला आहे. जनसंघ आणि भाजपच्या विस्तारात अडवाणींनी मोलाचे योगदान दिले असून नागपूरच्या संघ मुख्यालयात तसेच संघाच्या विजयादशमीसह अन्य मोठय़ा कार्यक्रमांत अडवाणींची हजेरी राहिलेली आहे. या पाश्र्वभूमीवर अडवाणींच्या राजीनाम्याने संघाचे स्वयंसेवक अस्वस्थ झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
संघ परिवाराचे तूर्त ‘थांबा आणि पाहा’
भाजपच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या लालकृष्ण अडवाणींच्या राजीनाम्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिशय सावध प्रतिक्रिया देताना ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. भाजपच्या गोव्यातील कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या त्या अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहेत. भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह हे अडवाणींचे मन वळविण्याचे प्रयत्न करीत असून त्यानंतरच संघ या घडामोडींवर योग्यवेळी भाष्य करील
First published on: 11-06-2013 at 02:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss watch and wait role in advani resignation