scorecardresearch

उर्फी जावेद प्रकरण तापलं, चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस; चाकणकर म्हणाल्या, “दोन दिवसांत…”

महिला आयोगाने अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली होती, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता.

उर्फी जावेद प्रकरण तापलं, चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस; चाकणकर म्हणाल्या, “दोन दिवसांत…”
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. याप्रकरणी काल त्यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयाोगावरही टीकास्र सोडले. महिला आयोगाने अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली. मात्र, उर्फीला जाणीवपूर्वक नोटीस पाठवत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, या आरोपाबाबत आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – “उर्फीबरोबर महिला आयोगही बेफाम झालं का?” चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर हल्लाबोल; म्हणाल्या, “रस्त्यावरील नंगानाच…”

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

“काल चित्रा वाघ यांनी माध्यमांना खोटी माहिती दिली. अनुराधा बेवसिरीजच्या पोस्टरवरून राज्य महिला आयोगाने तेजस्विनी पंडीतला कोणतीही नोटीस पाठवली नाही. याबाबत आम्ही अनुराधा वेबसिरीजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. आम्हाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ही नोटीस पाठवली असून दिग्दर्शक म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश या नोटीसद्वारे देण्यात आले होते. त्यानंतर संजय जाधव यांनी आयोगाला त्यासंबंधित उत्तर दिले. मात्र, यादरम्यान कुठेही तेजस्विनी पंडितचा उल्लेख नव्हता”, असे स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिले.

हेही वाचा – “परत सांगतोय नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…” संजय राऊतांनी एकेरी भाषेत व्यक्त केला संताप!

महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस

“महिला आयोग गेल्या ३० वर्षांपासून काम करते आहे. आयोगाची गरिमा मोठी आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी महिला आयोगासाठी काम केलं आहे. त्यामुळे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अशाप्रकारे खोटे आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटीस बजावली आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच चित्रा वाघ यांनी याप्रकरणी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा महिला आयोग त्यांच्यावर कारवाई करेन”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Video: अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याला काही तासांतच लाखो व्हयूज; बोल्ड ड्रेसमध्ये केलेल्या डान्सची होतोय चर्चा

“भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र दिले आहे. त्यामुळे उर्फी जावेदचे समर्थन कोण करते आहे कोण नाही? याबाबत बोलायचा अधिकार चित्रा वाघ यांना नाही. त्यांनी नको त्या ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी महत्त्वाच्या मुद्यांवर बोललं पाहिजे. महाराष्ट्रात रोज ३४ मुली मिसींग होत असल्याच्या तक्रारी येतात, त्यावर चित्रा वाघ यांनी बोललं पाहिजे. ओमानमधील महिलांचा विषय आहे. ओमानध्ये पुण्यातल्या अनेक महिला अडकल्या आहेत, हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने महिला आयोग काम करते आहे”, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 16:31 IST

संबंधित बातम्या