Rupali Chakankar on Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates : हगवणे कुटुंबातील दोन्ही सुनांचा छळ झाल्याची माहिती आता समोर आली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिची मोठी जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी हगवणे हिने अनेक माध्यमांना प्रतिक्रिया देत कुटुंबातील सदस्यांचे काळे चेहरे समोर आणले. दरम्यान, याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली होती. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती आहे.
राज्य महिला आयोगाकडे वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे आणि जाऊ मयुरी हगवणे या दोघींनी एकमेकांविरोधात ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. एकाच दिवशी या दोघींनी एकमेकांविरोधात मेलद्वारे तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लागलीच बावधन पोलीस ठाण्यात यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, असंही चाकणकरांनी स्पष्ट केलं. दरम्यान हे प्रकरण कौटुंबिक असल्याने याप्रकरणी समुपदेशनासाठी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना बोलावलं होतं, असंही चाकणकर म्हणाल्या.
…तर वैष्णवीचा जीव वाचला असता
गेल्यवर्षी नोव्हेंबर महिन्यात या कुटुंबातील वाद राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झालेला असताना लागलीच यावर कारवाई केली असती तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता असं वाटत नाही का? असा प्रश्न रुपाली चाकणकरांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “महिला आय़ोगाकडे आलेल्या तक्रारींना संबंधित विभागाकडे पाठवण्याचं काम महिला आयोगाचं असतं. गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर तापासात जे पुरावे सापडतील ते विधी सेवा प्राधिकरणाकडे देऊन त्यासंदर्भात कोर्टाने निकाल देणं अपेक्षित असतं. एकच काम एकच विभाग कधीच करू शकत नाही. त्यामुळे आयोगाकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ एफआयआर दाखल केली. आयोगाने सांगितल्यानंतर एफआयआर दाखल केली आहे.”
कस्पटे कुटुंबियांची घेतली भेट
कस्पटे कुटुंबियांची भेट घेऊन मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. ही घटना घडल्यानंतर १९ तारखेला सुमोटो दाखल केला. त्यानंतर तक्रार बावधन पोलिस ठाण्यात पाठवली. त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. कस्पटे कुटुंबियांना अधिक गुन्हे दाखल करायचे आहेत. घटना घडल्यानंतर माणूस वेदनेत असतो, पण नंतर पुराव्यांनुसार अधिक गुन्हे दाखल करता येतात. दीर आणि सासऱ्याला आज सकाळी अटक करण्यात आली आहे, असंही त्या म्हणाल्या.