ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यामुळे ज्ञानवंत पिढय़ा निर्माण झाल्या असून यापुढे काळाची गरज विचारात घेऊन ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यास हे विद्यार्थी देशाला प्रगतिपथावर नेतील, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
शहर हद्दवाढ भागातील देगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या गोपाबाई रामकिसन बलदवा प्रशालेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तथा नामकरण सोहळा शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब पाटील होते. या वेळी व्यासपीठावर शेकापचे नेते, आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह महापौर अलका राठोड, आमदार दिलीप माने, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, रामकिसन ऊर्फ पापाशेठ बलदवा, गोपीबाई बलदवा, उद्योगपती प्रेमरतन दमाणी, अण्णासाहेब पाटील, बिपीनभाई पटेल आदींची उपस्थिती होती. संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील यांनी प्रास्ताविक केले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले,की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दऱ्याखोऱ्यातील वंचित घटकातील गोरगरीब मुलांना शिक्षणाची दारे खुली केली. ते खऱ्या अर्थाने समाजसेवक होते. त्यांच्या संस्थेचे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यकर्तृत्व गाजवत आहेत. भाऊरावांनी सावित्रीबाईंचे विचार घेऊन स्त्रियांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यामुळे रयत संस्थेचा वटवृक्ष फोफावला. त्या वटवृक्षाची फांदी होण्याचे भाग्य बलदवा कुटुंबीयांना मिळाले, असे उद्गार त्यांनी काढले.
देगावच्या बलदवा प्रशालेत शिक्षक गुणवत्ताधारक असल्यामुळे संस्थेच्यावतीने येथे गुरूकुल प्रकल्प सुरू केला जाईल. यात शाळेचे अध्यापन १२ तास चालणार असून इंग्रजी संभाषणकला वर्ग, भाषा प्रयोगशाळा, संगणकाच्या माध्यमातून या शाळेचा ‘डिजिटल शाळा’ म्हणून नावलौकिक वाढेल, असा विश्वास डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केला. तर, अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. रावसाहेब पाटील यांनी, रयत शिक्षण संस्थेची आधुनिकतेकडे वाटचाल असून संस्थेत दोन लाख ४० हजार विद्यार्थी संगणकाचे प्रशिक्षण घेत असल्याची माहिती दिली. संस्थेतील शिक्षक भाभा विज्ञान केंद्रातून शास्त्राचे शिक्षण घेत असून, संस्थेने शिक्षक सेवक भरती ऑनलाईन केल्यामुळे गुणवत्ताधारकांना सेवेची संधी मिळत असल्याचा दावाही केला. प्रा. प्रशांत नलावडे यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याद्यापक एम. एम. पाटील यांनी आभार मानले.