महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर आम्ही मुळीच शांत बसणार नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं? तसंच दाभोलकर, गौरी लंकेश यांना ठार करण्यात आलं ही कोणती भारतीय संस्कृती आहे? असे प्रश्न उपस्थित करत ९३ व्या अखिल भारतीय संमेलानाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीवर भाष्य केलं आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
JNU मधील हिंसाचारात काही विद्यार्थी जखमी झाले. त्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. तसंच अशा घटनांबाबत गप्प बसणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आजचे प्रश्न कोणते? असा मला प्रश्न पडतो. देशात वाढत चाललेली बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग आणि ढासळत असलेली अर्थव्यवस्था हे मुख्य प्रश्न आहेत असं म्हणत त्यांनी याबाबतची खंतही व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला
“मी एकदा जर्मनीला गेलो होतो. तिथल्या नागरिकांना मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की होय एक काळ असा होता की आम्ही हिटलरच्या धुंदीत होतो. तशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते. तशीच झडप आपल्यासमोरही आली आहे” असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली.
पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने फ्रान्सिस दिब्रेटो हे आज सकाळी झालेल्या साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडीला हजर राहू शकले नाहीत. मात्र संध्याकाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी व्हिल चेअरवर बसून हजेरी लावली. औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांना साहित्य संमेलनाची सूत्रंही प्रदान केली. उस्मानाबाद या ठिकाणी साहित्य ९३ वं साहित्य संमेलन पार पडतं आहे. या संमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा काही वेळापूर्वीच पार पडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सल्ला
“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठी भाषेचा आग्रह धरणारे आहेत. त्यांना सांगा हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा ही मंडळी तुमचं ऐकणार नाहीत.” असंही संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी वाचन संस्कृती ढासळत असल्याच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली. ” मला गौतम बुद्ध वाचून आयुष्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळे आपण प्रगल्भ होतो. आपल्या वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. अनेक पालकांना आजच्या घडीला वाटतं की इंग्रजी ही धनाची भाषा आहे. ती धनाची भाषा असेल पण लक्षात ठेवा मराठी ही मनाची भाषा आहे.” असंही दिब्रेटो म्हणाले.
निवडीच्या वादावरही भाष्य
“मी प्रभू येशूचा उपासक आहे, प्रभू येशू म्हणतात की त्यांना माफ कर ज्यांना माहित नाही ते काय करत आहेत. असं म्हणत त्यांनी आपल्या साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. मी संतांना मानणारा माणूस आहे. संतांना मी कधीही विसरु शकत नाही खासकरुन माझ्या लाडक्या तुकोबांना. माझी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेकजण माझा सत्कार करण्यासाठी आले. मी त्यांना सांगितले हा खर्च टाळा. मी साहित्याच्या मंदिराच्या पायरीजवळ दिवे लावणारा छोटासा सेवक आहे.”