अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठय़ा उत्साहात रंगणारा सारस्वतांचा मेळा यंदा उस्मानाबादेत होण्याची शक्यता आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने मागील तीन महिन्यांपासून तशी तयारी केली आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पथक उस्मानाबादेत येणार आहे. बडोदा, पंजाब आणि उस्मानाबाद या तीन ठिकाणी हे पथक भेटी देणार आहे.
अखिल भारतीय महामंडळाकडे संमेलन आयोजनासाठी १० ठिकाणांहून प्रस्ताव आले आहेत. त्यापकी महामंडळाने तीन ठिकाणांना भेटी देऊन तेथील आयोजकांच्या तयारीचा आढावा घेण्याचे ठरविले आहे. त्यात उस्मानाबादचा प्राधान्याने विचार केला जात आहे. संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील संतांचा पहिला मेळा तेर येथे जमला होता. तेच खऱ्या अर्थाने पहिले साहित्य संमेलन अशी मांडणी उस्मानाबादकर करतात. त्यानंतर थेट आठ शतकांनंतर उस्मानाबादेत मराठी भाषिकांचा उत्सव होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, कुंडलिक अतकरे, मुंबई येथील प्रतिनिधी उज्ज्वला मेहेंदळे, अशोक पायगुडे व नागपूर विभागाच्या वतीने दाते या सहाजणांचे पथक बुधवारी पाहणी करणार आहे. त्यानंतरच महामंडळाच्या वतीने यंदाचे संमेलन कोठे होणार याबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने साहित्य संमेलन मिळावे यासाठी मागील तीन महिन्यांपासून युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. संमेलनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची विस्तृत तयारी करण्यात आली आहे. संमेलनस्थळ, पाìकग व्यवस्था, निवासासाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि सर्वात महत्त्वाचे संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी आवश्यक असलेला निधी संकलन हा विषय या पथकासमोर मांडला जाणार आहे.
उस्मानाबादला प्राधान्य
यंदा होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळावे, यासाठी आग्रही मागणी केली आहे. महामंडळानेही उस्मानाबादलाच प्राधान्य असल्याचे संकेत दिले असल्याची माहिती उस्मानाबाद मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली. अत्यंत साधेपणाने परंतु साहित्य आणि साहित्यिकांचा सन्मान वृद्धिंगत व्हावा, असे संमेलन आयोजित करणार असल्याचा प्रस्ताव महामंडळाकडे सहा महिन्यांपूर्वी सादर केला होता. प्रस्तावातील मागणीप्रमाणे महामंडळ मसापने केलेल्या तयारीची पाहणी करणार आहे. मंगळवार, २४ जून रोजी सायंकाळी उस्मानाबादमधील विविध संस्था, संघटना, महिला बचतगट आणि संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उत्सुक मान्यवरांच्या बठकीचे आयोजन केले आहे.