कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जंगलात गेल्या दशकभरापासून एक वाघीण राज्य करत आहे. ‘सह्याद्री कोकण टायगर ०२’ अशा संज्ञेवरून (एसकेटी ०२) ही वाघीण ओळखली जाते. ती केवळ वन्यजीव नसून, संपूर्ण सह्याद्रीतील वाघांचा वंश वाढवणारी ठरली आहे. सन २०१४ ते २०१७ या काळात तिने तीन वेळा बछड्यांना जन्म दिला आणि तिची काही मादी बछडी आता प्रौढ होऊन सह्याद्रीच्या खोऱ्यातच प्रजनन करत आहेत.
आज वाघांच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या भारतात, या वाघिणीचा हा प्रवास वनसंवर्धनाचा एक प्रेरणादायी अध्याय ठरत आहे. या वाघिणीचा अधिवास व वंशाचा अभ्यास ‘वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांचे सहकारी २०१४ सालापासून करत आहेत. ‘कॅमेरा ट्रॅपिंग’च्या माध्यमातून तिची ओळख झाली असून, सह्याद्रीतील तिचा संचार अभ्यासला जात आहे.
सह्याद्रीतील वाघांचा संचार सह्याद्री- कोकण वन्यजीव भ्रमणमार्गाद्वारे (कॉरिडॉर) घडतो. या मार्गाची रचना महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून सुरू होऊन कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत विस्तारलेली आहे. यामध्ये सध्या अंदाजे ३२ वाघांचा वावर असून, केवळ महाराष्ट्रातील सह्याद्री परिसरात ११ ते १२ वाघ असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
सन २०१४ मध्ये या वाघिणीचे पहिले छायाचित्र मिळाले. तिच्या हद्दीत दुसरी मादी आढळली, तिला एसकेटू ०३ म्हणून नोंदले गेले. सन २०१५ मध्ये एसकेटू ०२ गवा खाताना दिसली आणि तिच्यासोबत तीन बछड्यांचीदेखील नोंद झाली आहे.
सन २०१७ मध्ये पुन्हा एकदा तीन बछड्यांसोबत ती असल्याचे दिसून आले. त्यातील एसकेटू ०७ ही मादी गोव्यातील म्हादई अभयारण्यात २०२१ साली आढळली. सन २०२४ मध्ये तिची दुसरी लेक ‘एसकेटू ०४’ तीन बछड्यांसोबत वावरताना दिसली.
सद्य:स्थितीत अंदाजे १५ वर्षांची असलेली ‘एसकेटू ०२’ वाघीण आजही निर्भयपणे सह्याद्रीच्या जंगलात वावरताना दिसते. २०२३ साली ती गर्भवती असल्याचे पुरावे मिळाले. परंतु, बछड्यांची नोंद झाली नाही. तरी तिचे अस्तित्व आजही वाघांच्या नैसर्गिक पुनरुत्पादनासाठी आशेचा किरण आहे.
‘एसकेटू ०२’ ही वाघीण वन्यजीव संरक्षण, अभ्यास आणि वनसंवर्धनाच्या दृष्टीने एक जिवंत प्रतीक ठरली आहे. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि काली व्याघ्र प्रकल्प यांच्यातील कॉरिडॉरचे संरक्षण अत्यावश्यक आहे. सध्या ‘एसटीआर’मध्ये नर वाघ आहेत. मात्र, माद्यांचे कॉरिडॉरमध्ये प्रजनन करणे ही सकारात्मक बाब वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी म्हटले आहे.
‘तिलारी– राधानगरी– चांदोली– कोयना हा संपूर्ण वनपट्टा एकत्र राखल्यामुळे कॉरिडॉरचे संवर्धन शक्य झाले. हे सह्याद्रीतील वन व्यवस्थापनाचे यश दाखवते असे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी म्हटले आहे.