राहाता : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने तीन दिवसीय कालावधीत (दि. ९ ते ११ जुलै) आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या झोळीत देणगी काऊंटर, ऑनलाईन, धनादेश, डीडी, मनिऑर्डर, डेबीट-क्रेडीट कार्ड, यूपीआय, सोने, चांदी, दर्शन व शुल्क आरती पास या सर्व मार्गांनी मिळून एकूण ६ कोटी ३१ लाख रुपयांचे दान जमा झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज, सोमवारी पत्रकारांना दिली.
रोख देणगी स्वरुपात १ कोटी ८८ लाख रु. दक्षिणा, देणगी काऊंटरवर १ कोटी १७ लाख, सशुल्क पास ५५ लाख ८८ हजार, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, धनादेश, डीडी. देणगी, मनीऑर्डर इ. एकूण २ कोटी ५ लाख रु., सोने ६६८.४०० ग्रॅम (किंमत ५७ लाख ८७ हजार) व चांदी ६,७९८.६८० ग्रॅम (५ लाख ८५ हजार रु.) यांचा समावेश आहे. गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत अंदाजे ३ लाखांवर साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.
उत्सव कालावधीत साईप्रसादालयात सुमारे १ लाख ८३ हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर दर्शन रांगेत १ लाख ७७ हजार साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकिटांच्या विक्रीतून ६४ लाख ५ हजार रुपये प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. साईधर्मशाळेत विविध भागातील पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. देणगीचा वापर संस्थानचे प्रसादालय, रुग्णालये, शैक्षणिक संकुल या सेवाकार्याबरोबरच साईभक्तांच्या विविध सेवासुविधांसाठी होत असल्याचे त्यांनी सांगितले.