असंख्य शिवभक्त आणि अनेक संघटनांनी केलेल्या मागणीनंतर अखेर ‘संभाजी बिडी’चं नाव बदलण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने या विडीची विक्री होणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील ‘साबळे वाघीरे आणि कंपनी’ ही कंपनी संभाजी बिडी या नावाने विडी उत्पादन करते. साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याची घोषणा यापूर्वीच केली होती, परंतु नाव बदलण्यास थोडा वेळ लागेल असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. आता अखेर कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलले आहे.

साबळे वाघीरे आणि कंपनी १९३२ पासून विडी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. १९५८ पासून कंपनीने संभाजी विडी नावाने उत्पादन सुरु केले होते. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडीला नको म्हणून संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी तीव्र आंदोलने केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ही मागणी घेऊन आंदोलनही करण्यात आले होते. अखेर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावाने विकली जाणार आहे.

या निर्णयाचं शिवभक्तांकडून आणि नागरिकांकडूनही स्वागत होत आहे. “छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी असलेल्या आपल्या सर्वांच्याच भावनांचा आदर ठेवून ‘साबळे वाघिरे आणि कंपनी’ने आपल्या विडीचं पूर्वीचं नाव बदलून ‘साबळे बिडी’ केलं. याबद्दल कंपनीचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिली आहे. संभाजी बिडीचं नाव बदलण्याची मागणी करण्यासाठी रोहित पवारांनी गेल्या वर्षी कंपनीच्या व्यवस्थापनाची भेट घेतली होती.


दरम्यान नाव बदलल्याने आता ‘संभाजी बिडी’ ही ‘साबळे बिडी’ या नावाने ओळखली जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji bidi name changes to sable bidi sas
First published on: 22-01-2021 at 11:50 IST