scorecardresearch

संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्त कार्यालयाला दिली दारुची बॉटल

‘संभाजी महाराज दारुच्या कैफात होते असा उल्लेख करुन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे ठरवून ठेवलेले षडयंत्र आहे.

सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने गुरुवारी आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात दारुची बॉटल दिली.

सर्व शिक्षा अभियानात ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

या पुस्तकावरुन संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात दारुच्या बॉटलसह धडक दिली. संतप्त कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. मात्र, आयुक्त रजेवर असल्याने शेवटी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पीएला दारुची बॉटल देत या घटनेचा निषेध केला. ‘संभाजी महाराज दारुच्या कैफात होते असा उल्लेख करुन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे ठरवून ठेवलेले षडयंत्र आहे. असा भयंकर बदनामी करणारा मजकूर राज्य सरकारच्या पुस्तकात छापला जातो आणि सरकार, शिक्षण विभाग त्यास परवानगी देते हा निव्वळ करंटेपणा आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sambhaji brigade supporters protest in pune against sambhaji maharaj alcoholic remark in book

ताज्या बातम्या