संगमनेर : झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून प्रेरणा घेत स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षांबाबत मोठी जागृती झाली आहे. अनेक उघडे बोडके डोंगर हिरवेगार झाले. या अभियानाची देशपातळीवर दखल घेतली गेल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
मालदाड येथील मायंबा डोंगर, कानिफनाथ मंदिर परिसरामध्ये जयहिंद लोकचळवळ व अमृत उद्योग समूहाच्या वतीने यावर्षीच्या २० व्या दंडकारण्य अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अभियानाचे मुख्य प्रवर्तक डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, बी. आर. चकोर, मालदाडचे सरपंच गोरख नवले, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, योगेश भालेराव, गोरख नवले, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, जगन्नाथ घुगरकर, अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या अभियानाचे हे २० वे वर्ष आहे. दरवर्षी कोट्यवधी बियांचे रोपण आणि रोपांची लागवड झाल्याने अनेक डोंगर हिरवेगार दिसू लागले आहेत, हे त्याचे फलित आहे. वृक्षारोपण आणि संवर्धन हे काम जिकिरीचे आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण, जनावरांपासून संरक्षण अशा सगळ्या बाबी जरी असल्या तरी तालुक्यात वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे काम आपल्या सगळ्यांना मिळून पुढे न्यायचे आहे. तालुक्यात आजवर आपण अनेक विकासकामे सातत्याने केली आहेत. आता काही लोक विविध समाज माध्यमांचा गैरवापर करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांपासून वेळीच सावध झाले पाहिजे.
ज्येष्ठ नेते माधवराव कानवडे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण, कालवे पूर्ण केले. मात्र, आता श्रेय दुसरेच घेत आहेत. जनतेसाठी अविरत झटणारे हे नेतृत्व जपण्याचे काम तालुक्यातील लोकांनी केले पाहिजे. स्वागत सरपंच गोरख नवले यांनी केले. प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर योगेश भालेराव यांनी आभार मानले.
गोरख नवले आदर्श सरपंच
सतत जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊन मालदाडचे सरपंच गोरख नवले यांनी विकासकामांचा पाठपुरावा केला. गावच्या परिसरात ८५ एकर भागावर कष्टातून त्यांनी वनराई फुलवली. संगमनेर ते चिंचोली गुरव या रस्त्यासाठी त्यांनी आपल्याकडे मोठा पाठपुरावा केला. आपणही त्या रस्त्यास मंजुरी दिली. अशा सर्व कामांसाठी पाठपुरावा करणारे नवले हे आदर्श सरपंच आहेत. त्याचे अनुकरण इतरांनी करावे, असा गौरव बाळासाहेब थोरात यांनी केला.