संगमनेर: विकासकामे करताना ठेकेदारांची मर्जी न राखता कामांचा दर्जा राखणे महत्त्वाचे आहे. संगमनेरातील सर्वच गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव कवडे होते. सरपंच निखिल निळे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, भाजप राज्य परिषद सदस्य दादाभाऊ गुंजाळ, अशोक कानवडे, दिलीप कोल्हे, सुनील कानवडे, मिनानाथ शेळके, माजी सरपंच अर्चना शेळके, अर्चना शेटे, सुमन शेटे, सोमनाथ नेहे, सूर्यभान शेटे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांपासून या तालुक्यात काही लोकांनी केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम केले. त्यांनी गोरगरीब जनतेच्या जीवावर अन्यायकारक प्रथा रुजवल्या. पण आता हे सगळं बंद होणार आहे. विजेचे रोहित्र नवीन घेण्यासाठी कोणाला एक रुपयाही देऊ नका. कार्यकर्ते हे माझे कुटुंब आहे, त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलेले सहन केले जाणार नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्यामागे भक्कमपणे उभे आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तर आपले पालकत्व घेतले आहे. त्यामुळे विकास निधी आणण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपकेंद्र लवकरच सुरू होईल

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र, ते अद्याप सुरू झाले नाही. त्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर आणि पालकमंत्री विखे यांच्या समवेत मुंबईत बैठक घेतली आहे. लवकरच कर्मचारी भरती करून हे आरोग्य उपकेंद्र सुरू केलं जाईल. -आमदार अमोल खताळ.