संगमनेर : भूमिगत गटार दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ठेकेदार आस्थापनेवरील कामगार अतुल पवार यांच्या वारसांना राज्य सरकारकडून ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते आज, शनिवारी देण्यात आले. या घटनेतील दुसरा मृत तरुण रियाज पिंजारी याच्या कुटुंबीयांनासुद्धा शासनाच्या वतीने भरीव स्वरूपाची मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.

शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील भूमिगत गटारीच्या चेंबरमधील मैला काढताना अतुल पवार व रियाज पिंजारी या दोघांचा परवा मृत्यू झाला. आमदार खताळ यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. आमदार खताळ यांनी आज मदिनानगर येथील पिंजारी आणि पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. या वेळी शासनाच्या वतीने ३० लाख रुपयांच्या मदतीचे पत्र पवार कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.

या वेळी खताळ म्हणाले, की संबंधित ठेकेदार हे एका पक्षाशी संबंधित असल्याने गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाला. परंतु दोषींवर कारवाईची भूमिका घेतल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शासनाच्या वतीने पवार व पिंजारी कुटुंबीयांना भरीव मदत कशी देता येईल, याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांशी चर्चा करू.

हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारास अटक करावी, अशी मागणी मृत तरुणांच्या नातेवाइकांनी आमदार खताळ यांच्याकडे केली. त्यावर ते म्हणाले, की गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे अटक होणारच आहे. त्यांनी जामिनासाठी कितीही प्रयत्न केला, तरी कायद्यापासून कोणीही पळू शकणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, ॲड. श्रीराम गणपुले, शौकत जहागीरदार, मजहर शेख, बबलू काझी, गुड्डू शेख, राहुल भोईर, आसिफ पिंजारी, मेहबूब शकील पिंजारी, इरफान मसूरी, प्रकाश पवार, अप्पा पवार, सोमनाथ रणशूर, अण्णा शिंदे, शशिकांत पवार आदी उपस्थित होते.